GT Express Fire – चेन्नई-दिल्ली जी. टी. एक्सप्रेसला वर्ध्याजवळ आग; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नवी दिल्लीहून तामिळनाडूतील तांबरमकडे जाणाऱ्या १२६१६ जी. टी. एक्सप्रेसच्या शेवटच्या डब्याला मंगळवारी सकाळी वर्ध्याजवळील सिंदी रेल्वे स्थानकावरून जात असताना भीषण आग लागली. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे दुसऱ्या डब्यात हलवण्यात आले आहे.

मध्य रेल्वेचे प्रवक्ते संजय मुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ११:२० च्या सुमारास ही गाडी सिंदी स्थानकातून जात असताना, तिथल्या उप-स्टेशन अधीक्षकांना गाडीच्या सर्वात शेवटच्या डब्यातून धूर निघताना दिसला. हा डबा ‘SLRD’ (Seating-cum-Luggage Rake with Disabled) म्हणजेच गार्डचा डबा होता, ज्यामध्ये अपंग व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग आणि सामानाचा कप्पा असतो. स्टेशन अधीक्षकांनी तात्काळ वॉकी-टॉकीवरून गार्डला याची सूचना दिली आणि गाडी थांबवण्याचे निर्देश दिले. सिंदी आणि तुळजापूर स्थानकांच्या दरम्यान गाडी थांबवण्यात आली.

रेल्वे प्रशासनाने तात्काळ संबंधित डबा गाडीपासून वेगळा केला. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. ज्यावेळी आग लागली, त्यावेळी त्या डब्यात साधारण २५ ते ३० प्रवासी होते. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढून ट्रेनमधील इतर डब्यांमध्ये हलवले. प्राथमिक माहितीनुसार, आग गार्ड केबिनला लागून असलेल्या ‘पार्सल आणि लगेज’ विभागातून सुरू झाली असावी, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सर्व आवश्यक सुरक्षा चाचण्या पूर्ण केल्यानंतर आणि प्रवाशांची पर्यायी व्यवस्था केल्यावर, दुपारी १:०६ वाजता ट्रेन पुढील प्रवासासाठी रवाना झाली. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि पर्यवेक्षकांचे पथक सध्या घटनास्थळी असून, आगीचे नेमके कारण आणि झालेल्या नुकसानीचा सविस्तर तपास करत आहेत.

Comments are closed.