5 Terrorist Arrested | जैशच्या ५ दहशतवाद्यांना गुजरात एटीएसकडून अटक, जगन्नाथ रथयात्रेपूर्वी तपास यंत्रणांना यश
► वृत्तसंस्था अहमदाबाद
अहमदाबाद समवेत पूर्ण गुजरातमध्ये भगवान जगन्नाथ यांची भव्य रथयात्रा पुढील काही दिवसांमध्ये पार पडणार आहे. या मोठ्या उत्सवापूर्वी गुजरात एटीएसने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मोठे यश मिळविले आहे. एटीएसने सिद्धपूर येथून 5 दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे.
या दहशतवाद्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. 16 जुलै रोजी अहमदाबाद, भावनगर, वडोदरा, पाटन आणि राजकोट समवेत अनेक शहरांमध्ये रथयात्रा काढण्यात येणार आहे.
रथयात्रेच्या आयोजनादरम्यान शांतता आणि सुरक्षा व्यवस्थेला धक्का पोहोचविण्याच्या उद्देशाने दहशतवादी संघटना सक्रिय झाल्याची गुप्तचर माहिती प्राप्त झाली होती.
चौकशीदरम्यान दहशतवादी संघटनांचे कनेक्शन सिद्धपूरशी असल्याचे पुरावे मिळाले, ज्यानंतर एटीएसने स्थानिक पोलिसांसोबत मिळून शोधमोहीम राबविली आणि 5 दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा :America – Iran Conflict | भांडण अमेरिका – इराणचे, बळी भारतीयांचे…आजवर इतके भारतीय प्राणास मुकले
या दहशतवाद्यांचा जैश-ए-मोहम्मद या प्रतिबंधित संघटनेशी संबंध असल्याचा संशय आहे. याप्रकरणी विस्तृत चौकशी करण्यात येत आहे. याचबरोबर बनासकांठा येथून 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
प्रशासन अलर्ट मोडवर
रथयात्रेसारख्या संवेदनशील उत्सवांना पाहता गुजरात पोलीस आणि एटीएस अलर्ट मोडवर आहे. संशयितांची धरपकड करण्याचे सत्र मागील काही दिवसांपासून जारी आहे.
11 दिवसांपूर्वी देखील 8 दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले होते त्यावेळी सिद्धपूर येथून 3, चिखली येथून 1 तर पालनपूर येथून 3 जणांना पकडण्यात आले होते.
रथयात्रेदरम्यान कुठलाच अनुचित प्रकार घडू नये याकरता राज्य सरकार अन् सुरक्षा यंत्रणा सजग आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे.
Comments are closed.