पत्नी आणि दोन मुलांची हत्या करणाऱ्या वन अधिकाऱ्याचे सहकाऱ्यासोबत प्रेमसंबंध, संबंधित महिलेची चौकशी
आपली पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून त्यांचे मृतदेह भावनगर येथील निवासस्थानाच्या जवळच्या खड्ड्यात पुरणाऱ्या गुजरातच्या वन अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या अधिकाऱ्याचे एका महिला सहकाऱ्यासोबत गेली चार वर्षे प्रेमसंबंध होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शैलेश खांभला (३९), जो सहाय्यक वनसंरक्षक (ACF) आहे, त्याची २०२० मध्ये वन विभागात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याशी मैत्री झाली. काही काळातच या मैत्रीचे प्रेमसंबंधात रुपांतर झाले. असे असले तरी या गुन्ह्यात त्या महिलेचा सहभाग आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी त्या महिलेचीही चौकशी केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वन अधिकारी शैलेश खांभला यांची नुकतीच भावनगर येथे बदली झाली होती, तर त्यांची ४० वर्षीय पत्नी नयना, १३ वर्षांची मुलगी पृथा आणि ९ वर्षांचा मुलगा भव्य हे सुरतमध्ये राहत होते. सुट्टीसाठी ते भावनगरला खांभला यांच्याकडे आले होते. त्यानंतर लगेचच ते बेपत्ता झाले, ज्यामुळे कुटुंबात चिंता निर्माण झाली आणि मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू झाली.
पोलीस आणि सुरक्षा रक्षकाला संशय
५ नोव्हेंबर रोजी, अधिकाऱ्याने पोलिसांशी संपर्क साधला आणि दावा केला की तो ड्युटीवर असताना त्याच्या सुरक्षा रक्षकाने त्याची पत्नी आणि मुलांना ऑटो-रिक्षातून बाहेर पडताना पाहिले. मात्र, सुरक्षा रक्षकाने हा दावा फेटाळला. चौकशीदरम्यान खांभलाचे ‘विचित्र वागणे’ आणि बेपत्ता असलेल्या कुटुंबाबद्दल कोणतीही ‘चिंता नसणे’ यामुळे पोलिसांचा संशय वाढला.
खांभलाच्या कॉल रेकॉर्डच्या प्राथमिक तपासणीतून असे दिसून आले की तो गिरीश वानिया नावाच्या कनिष्ठ अधिकाऱ्याच्या संपर्कात होता. आरोपीने वानियाला कचरा टाकण्यासाठी आपल्या घरामागे दोन खड्डे खणायला सांगितले होते आणि वानियाने २ नोव्हेंबर रोजी ते खड्डे खणले. चार दिवसांनंतर, आरोपी अधिकाऱ्याने वानियाला खड्डे भरण्यासाठी डंपर ट्रक पाठवायला सांगितला, खड्ड्यात ‘नीलगाय’ पडल्यामुळे ते बुजवायचे आहेत, असे त्याने कारण दिले होते.
पूर्वनियोजित हत्या
१६ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी आरोपीच्या पत्नी आणि मुलांचे मृतदेह याच खड्ड्यांमधून बाहेर काढले. त्यानंतर वन अधिकाऱ्याला अटक करण्यात आली.
खांभलाने चौकशीदरम्यान आपला गुन्हा कबूल केला आणि हा पूर्व-नियोजित खून होता हे उघड केले. त्याने खून केल्यानंतर आपल्या पत्नीच्या फोनवरून स्वतःला एक संदेश पाठवला होता, ज्यात तिने दुसऱ्या कोणासोबत राहण्यासाठी घर सोडल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्याने तो फोन ‘एअरप्लेन मोड’वर टाकला होता.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि त्याच्या पत्नीमध्ये झालेला कौटुंबिक वाद हे या गुन्ह्याचे प्राथमिक कारण होते, ज्यात पीडितांचा उशीने श्वास कोंडून खून करण्यात आला होता. पोलिसांनी सांगितले की, खांभलाने त्यांना सांगितले की, त्याची पत्नी सासरच्या लोकांसोबत सुरतमध्ये राहू इच्छित नव्हती आणि तिची भावनगरमध्ये एकत्र राहण्याची मागणी होती, ज्याला त्याने विरोध केला होता.
Comments are closed.