सलग तीन पराभवानंतर अखेर विजय, प्रतिस्पर्धी संघ 108 धावांत गारद; 8 फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत
महिला प्रीमियर लीग (WPL) टी20 स्पर्धेत गुजरात जायंट्स संघाने शानदार पुनरागमन करत यूपी वॉरियर्स संघावर 45 धावांनी दणदणीत विजय मिळवला. सलग तीन पराभवानंतर मिळालेल्या या विजयामुळे गुजरात जायंट्स पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर परतला आहे. गुजरातने प्रथम फलंदाजी करत 8 विकेट्सच्या मोबदल्यात 153 धावा केल्या, तर प्रत्युत्तरात यूपी वॉरियर्सचा संघ अवघ्या 108 धावांत गारद झाला.
गुजरातकडून सोफी डिवाइन हिने शानदार कामगिरी करत नाबाद 50 धावांची खेळी केली. 42 चेंडूंच्या या खेळीत तिने 3 षटकार आणि 2 चौकार ठोकले. मागील तीन सामन्यांतील अपयश मागे टाकत डिवाइनने (50) अत्यंत संयमी आणि आक्रमक फलंदाजी केली. डावाच्या सुरुवातीला ती रनआऊट होण्यापासून बचावली, तर 35 धावांवर नो-बॉलवर तिचा झेल सुटला. या संधीचा पुरेपूर फायदा घेत तिने अखेरच्या षटकात शिखा पांडेच्या गोलंदाजीवर दोन षटकार ठोकत संघाला 150 धावांचा टप्पा पार करून दिला.
यूपी वॉरियर्सकडून फोबे लिचफिल्ड हिने 32 धावा, तर क्लो ट्रायोन हिने नाबाद 30 धावांचे योगदान दिले. मात्र अन्य फलंदाज अपयशी ठरल्याने संघाला पराभव स्वीकारावा लागला.
लक्ष्याचा पाठलाग करताना यूपी वॉरियर्सला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. किरण नवगिरे शून्यावर बाद झाली. रेणुका सिंहच्या चेंडूवर विकेटकीपर बेथ मूनीच्या पॅडला लागून चेंडू थेट स्टंपवर आदळला आणि किरणला तंबूत परतावं लागलं. त्यानंतर फोबे लिचफिल्डने आक्रमक सुरुवात केली आणि चौकारांच्या सहाय्याने धावा जमवल्या. मात्र आठव्या षटकात अॅश्ले गार्डनरच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप करण्याच्या नादात ती रेणुकाकडे झेल देऊन बाद झाली.
यानंतर गुजरातच्या गोलंदाजांनी सामन्यावर पूर्ण वर्चस्व मिळवलं. रेणुका सिंहने हरलीन देओलला, तर राजेश्वरी गायकवाड हिने दीप्ती शर्मा आणि श्वेता सहरावत यांना बाद करत दबाव वाढवला. राजेश्वरीने एकूण तीन विकेट्स घेतल्या, तर रेणुका सिंह आणि सोफी डिवाइन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
Comments are closed.