मोबाईल वसुलीत गुजरात पोलीस आघाडीवर आहेत

आतापर्यंत 74 हजारांहून अधिक मोबाइल मूळ मालकांना परत

वृत्तसंस्था, गांधीनगर

हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाइल फोन शोधून ते मूळ मालकांना परत मिळवून देण्यासाठी गुजरात पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाच्या (डीओटी) सेंट्रल इक्वपिमेंट आयडेंटिटी रजिस्टर (सीईआयआर) पोर्टलच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे गुजरातचा मोबाइल रिकव्हरी दर वाढला आहे. 26 ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, गुजरातने 50.75 टक्के रिकव्हरी दर नोंदवला असून मोठ्या राज्यांमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे.

ऑक्टोबर 2025 मध्ये गुजरातचा मोबाइल रिकव्हरी दर 41 टक्के होता. यंदा तो वाढून 50.75 टक्क्मयांवर पोहोचला आहे. म्हणजेच वर्षभरात रिकव्हरी दरात 9.75 टक्के अंकांची वाढ झाली आहे. देशातील मोबाइल रिकव्हरीचा सरासरी दर 37.4 टक्के असल्याचेही उपलब्ध आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.

हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाइलचा गैरवापर रोखणे, नागरिकांना त्यांचे फोन परत मिळवून देणे आणि मोबाइलशी संबंधित सायबर फसवणुकीला आळा घालणे, यासाठी या प्रणालीचा उपयोग होत आहे.

काय आहे सीईआयआर पोर्टल

सीईआयआर पोर्टल ही दूरसंचार विभागाची प्रणाली आहे. हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाइलचा आयएमईआय क्रमांक वापरून संबंधित उपकरण ब्लॉक करण्याची आणि त्याचा शोध घेण्याच्या प्रक्रियेत मदत करण्याची सुविधा या प्रणालीद्वारे उपलब्ध होते. मोबाइल परत मिळाल्यानंतर आवश्यक पडताळणी करून तो मूळ मालकाला सुपूर्द केला जाऊ शकतो.

Comments are closed.