शिक्षणासाठी गेलेल्या हिंदुस्थानच्या तरुणाची रशियन सैन्यात सक्तीने भरती, तरुणाने व्हिडीओद्वारे सांगितली आपबिती

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या युद्धा दरम्यान एका हिंदुस्थानी तरुणाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. शिक्षणासाठी रशियाला गेलेल्या या तरुणाने रशियन सैन्यात सहभागी होण्यासाठी आपल्यावर कसा दबाव आणला गेला? याची आपबिती या व्हिडिओद्वारे मांडली आहे. सध्या तो युक्रेनच्या ताब्यात असून त्याने तिथूनच हिंदुस्थानी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साहिल मोहम्मद हुसैन असे या तरुणाचे नाव आहे. तो गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. साहिल विद्यार्थी व्हिसावर रशियामध्ये शिक्षण घेण्यासाठी आला होता. अभ्यासासोबतच तो एका कुरिअर कंपनीत पार्टटाईम काम करायचा. मात्र, रशियन पोलिसांनी त्याला ड्रग्जच्या तस्करीप्रकरणी अटक केल्याचा आरोप त्याने केला आहे. या प्रकरणातून सुटका हवी असेल तर, रशियन सैन्यात भरती होऊन युद्धात लढावे लागेल, अशी अट त्याला घालण्यात आली होती. या भीतीपोटी आणि कायदेशीर कचाट्यातून वाचण्यासाठी त्याने रशियन सैन्याचा प्रस्ताव स्वीकारला, असे त्याने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
साहिलने दिलेल्या माहितीनुसार, रशियन सैन्यात भरती झाल्यानंतर 15 दिवसांच्या ट्रेनिंगनंतर लगेचच त्याला युद्ध लढण्यासाठी आघाडीवर पाठवण्यात आले. मात्र, तेव्हाच संधी मिळताच साहिलने युक्रेनच्या सैन्यासमोर आत्मसमर्पण केले. रशियन सैन्याने त्याला दिलेल्या आश्वासनानुसार कोणताही मोबदला दिला नाही. फक्त आश्वासने देऊन त्याला युद्ध लढण्यास दबाव टाकण्यात आल्याचे साहिलने व्ह़िडीओमध्ये सांगितले आहे. तसेच त्याने इतर हिंदू नागरिकांना रशियन सैन्यात न जाण्याचे आवाहन केले आहे.
साहिलने व्हिडीओमध्ये हिंदुस्थानी तरुणांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. “रशियात असे अनेक लोक आहेत जे तुम्हाला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून सैन्यात भरती होण्यास भाग पाडतात. त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नका,” असे त्याने म्हटले आहे. साहिलने हिंदुस्थान सरकारला विनंती केली आहे की, त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करून त्याची सुरक्षित सुटका करावी आणि त्याला पुन्हा हिंदुस्थानात आणण्यासाठी प्रयत्न करावेत.
दुसरीकडे, साहिलच्या आईने मुलाला सुरक्षित हिंदुस्थानात आणण्यासाठी दिल्ली कोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी फेब्रुवारीमध्ये होणार आहे.

Comments are closed.