प्ले ऑफसाठी मुंबई-दिल्लीत संघर्ष, प्ले ऑफच्या शर्यतीतून लखनौसुद्धा बाद

रविवारी गुजरातने दिल्लीचा दहा विकेटनी धुव्वा उडवला आणि आयपीएलच्या प्ले ऑफचा गुंता एका विजयाने सोडवला. गुजरातच्या विजयाने ते प्ले ऑफमध्ये पोहोचलेच, पण त्यांच्या साथीने बंगळुरू आणि पंजाबचाही प्ले ऑफचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे प्ले ऑफच्या चौथ्या स्थानासाठी मुंबई, दिल्ली आणि लखनौ या तिघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार होती, पण हैदराबादने लखनौचा सहज पराभव करत त्यांचाही स्पर्धेतून खेळ खल्लास केला. परिणामतः प्ले ऑफच्या चौथ्यासाठी मुंबई आणि दिल्ली यांच्यात संघर्ष रंगेल. ज्याचे सर्वाधिक गुण तोच प्ले ऑफचा चौथा संघ ठरेल.

आयपीएल आता आपल्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलाय. साखळीत मुंबई व दिल्ली या संघांचे प्रत्येकी दोन सामने शिल्लक आहेत. मुंबईने आतापर्यंत खेळलेल्या 12 पैकी 7 लढती जिंकल्या असून 5 गमावल्या आहेत, तर या संघाच्या खात्यात 14 गुण आहे. दिल्लीनेही आतापर्यंत खेळलेल्या 12 पैकी 6 लढती जिंकल्या असून 5 गमावल्या आहेत. एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने या संघाकडे एकूण 13 गुण आहेत. रविवारपर्यंत प्ले ऑफच्या शर्यतीत असलेला लखनौ बाद झाल्यामुळे त्यांच्या उर्वरित 2 लढती केवळ औपचारिक ठरणार आहेत. त्यामुळे मुंबई आणि दिल्लीला आपल्या दोन्ही लढती जिंकून प्ले ऑफची चौथी जागा बुक करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे 22 मे रोजी वानखेडेवर होणाऱया लढतीतच प्ले ऑफचा फैसला लागणार आहे. मुंबई-दिल्लीतील जो संघ जिंकेल त्याचे प्ले ऑफमधील स्थान जवळजवळ पक्के होईल, पण त्यावर शिक्कामोर्तब मात्र उभय संघाच्या 14 व्या साखळी लढतीच्या निकालावर अवलंबून असेल.

वानखेडेवर जो संघ जिंकेल तो काहीसा आघाडीवर असेल. या लढतीनंतर दिल्लीचा शेवटचा साखळी सामना चेन्नईविरुद्ध आहे, तर मुंबई पंजाबविरुद्ध भिडेल. या सामन्यातील निकालानंतरच कोणता संघ चौथा ठरला, हे कळणार आहे. त्यामुळे बाकी सर्व अंदाज बांधून काहीही उपयोग होणार नाही, हेच तूर्तास सत्य आहे.

Comments are closed.