गुजरात टायटन्सचा नवा बॅटिंग कोच ठरला! शुबमन गिलच्या संघात ‘या’ दिग्गज खेळाडूची एन्ट्री

गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2026) आगामी हंगामासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन याची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. फ्रँचायझीने मंगळवारी यासंदर्भात घोषणा केली. दोन वेळा वनडे विश्वचषक जिंकणारा आणि आपल्या काळातील सर्वात प्रभावशाली सलामीवीरांपैकी एक असलेल्या हेडनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अत्यंत चमकदार राहिली आहे. त्यांना टी-२० फलंदाजीचा व्यापक अनुभव असून खेळातील बारकावे ते उत्तमरीत्या जाणतात.
हेडन यांनी तिन्ही फॉरमॅटमध्ये २७३ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये त्यांनी १५,००० हून अधिक धावा केल्या असून आयसीसीच्या अनेक स्पर्धा जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
गुजरात टायटन्सचे क्रिकेट संचालक विक्रम सोळंकी म्हणाले की, “मॅथ्यू यांची नियुक्ती आमच्या प्रवासाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर झाली आहे. उच्च स्तरावरील त्यांचा अनुभव आणि उदयोन्मुख प्रतिभेला मार्गदर्शन करण्याची त्यांची क्षमता आगामी हंगामात आमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.”
या नियुक्तीवर बोलताना हेडन म्हणाले की, “चांगली फलंदाजी प्रतिस्पर्ध्यावर दबाव निर्माण करते, पण उत्कृष्ट फलंदाजी खेळावर आपले वर्चस्व गाजवते. गुजरात टायटन्समध्ये आम्हाला हेच निकष प्रस्थापित करायचे आहेत.”
हेडन यांनी आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून ३२ सामने खेळले आहेत. ते ऑस्ट्रेलियाचाच त्यांचा माजी सहकारी मॅथ्यू वेड याची जागा घेतील, जो गेल्या हंगामात गुजरात टायटन्सचा सहाय्यक प्रशिक्षक होता.
Comments are closed.