GT vs PBKS: कोण आहे अशोक शर्मा? सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी गाजवल्यानंतर आता गुजरात टायटन्सकडून करणार आयपीएल पदार्पण!

आयपीएल 2026 स्पर्धेत आज (31 मार्च) गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स (GT vs PBKS) यांच्यात आयपीएलचा चौथा सामना खेळला जात आहे. हा सामना हाय-स्कोअरिंग होण्याची दाट शक्यता आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरवर (Shreyas Iyer) असतील, जो बऱ्याच काळानंतर मैदानात परतला आहे. मात्र, सध्या चर्चा आहे ती गुजरात टायटन्सचा नवा वेगवान गोलंदाज अशोक शर्मा (Ashok Sharma) याची, ज्याला कर्णधार शुबमन गिलने (Shubman gill) आज प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

राजस्थानच्या 23 वर्षीय अशोक शर्माने गेल्या 1-2 वर्षात आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. 2025 च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने 8 सामन्यांत 20 विकेट्स घेऊन अव्वल स्थान पटकावले होते. 4/16 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

अशोक शर्मा सातत्याने 140 किमी तास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करतो, तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने 150 किमी तास वेगाचा टप्पाही ओलांडला आहे. चाहत्यांच्या मते, तो उमरान मलिकपेक्षाही अधिक घातक ठरू शकतो.

अशोक शर्माने याआधी कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्ससाठी ‘नेट बॉलर’ म्हणून काम केले आहे. 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला 30 लाख रुपयांना खरेदी केले होते, पण नंतर त्याला रिलीज करण्यात आले. त्याच्या कामगिरीवर खुश होऊन गुजरात टायटन्सने आयपीएल 2026 च्या लिलावात त्याला 90 लाख रुपयांना (200 टक्के पगारवाढ देऊन) आपल्या संघात सामील केले. आज अखेर त्याचे आयपीएलमध्ये खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. गुजरातकडून तो आज आपले पदार्पण करत आहे, ज्यामुळे त्याच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

Comments are closed.