टी-20 क्रिकेटमध्ये कधीच शून्यावर बाद झाला नाही 'हा' 23 वर्षीय फलंदाज! कुटल्या 2000 धावा

सध्या इंडियन प्रीमियर लीगचा (Indian premier league 2025) 18वा हंगाम सुरू आहे. या हंगामात अनेक युवा खेळाडू आपल्या दमदार कामगिरीने छाप पाडत आहेत. वर्षानुवर्षे या लीगमधून एकापेक्षा एक चांगला खेळाडू उदयास येतो. यावेळी, एका 23 वर्षीय फलंदाजाची खूप चर्चा आहे. या तरुण खेळाडूने टी-20 क्रिकेटमध्ये असा पराक्रम केला आहे जो आतापर्यंत कोणताही फलंदाज करू शकला नाही. हा खेळाडू आयपीएलवरही राज्य करत असल्याचे दिसून आले. या खेळाडूने विरोधी संघाच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले.

आपण 23 वर्षीय फलंदाज साई सुदर्शनबद्दल (Sai Sudarshan) बोलत आहोत, ज्याने (18 मे) रोजी 108 धावांची नाबाद खेळी करून पुन्हा एकदा आपली छाप पाडली. या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये साई सुदर्शन अव्वल स्थानावर आहे. त्याने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात 108 धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला जबरदस्त पद्धतीने विजय मिळवून दिला. 200 धावांचे लक्ष्य एकही विकेट न गमावता पाठलाग करून गुजरातने इतिहास रचलाच नाही तर सुदर्शनने एक विश्वविक्रमही केला आहे.

साई सुदर्शननेही टी-20 क्रिकेटमध्ये 2,000 धावा पूर्ण केल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्याने अद्याप शून्यावर आपली विकेट गमावलेली नाही. शून्यावर बाद न होता हा आकडा गाठणारा सुदर्शन पहिला फलंदाज ठरला. आयपीएलच्या या हंगामात त्याने आतापर्यंत 5 अर्धशतकांसह 1 शतक ठोकले आहे. सुदर्शनने 12 सामन्यांमध्ये 617 धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलच्या इतिहासातील दुसरे शतक ठोकले आहे.

आयपीएल 2025 मध्ये प्रत्येक सामन्यात सुदर्शन कर्णधार शुबमन गिलसोबत (Shubman Gill) उत्तम भागीदारी करताना दिसत आहे. या अखंड भागीदारीमुळे गुजरात टायटन्स आयपीएल 2025 च्या पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आणि प्लेऑफसाठीही पात्र ठरला आहे.

Comments are closed.