Gunfire erupts in gang war in Panchavati; illegal weapons used


पंचवटीतील नागचौक भागात रविवारी (दि.२) रात्री टोळीयुद्धातून गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेच्या आदल्याच दिवशी म्हणजे शनिवारी गणेशवाडीत दोन गटांतील वर्चस्वातून दगडफेक झाली होती. सातत्याने घडणार्‍या या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांचा धाक कमी झाल्याने नव्या अधिकार्‍यांच्या नियुक्तीची मागणीही यानिमित्ताने जोर धरू लागली आहे. (Gunfire erupts in gang war in Panchavati; illegal weapons used)

पहिली घटना

गणेशवाडी परिसरातील पोस्ट ऑफिस समोर शुक्रवारी (दि.३१) रात्री ११:१५ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी ओम्या उर्फ कार्तिक महेंद्र बेल्हाडकर (रा. कमलनगर, हिरावाडी) व मयुर भास्कर पवार (रा. कोळीवाडा, गणेशवाडी) या दोघांमध्ये वाद झाले होते. या वादाचे पर्यावसन नंतर टोळीयुद्धात झाले. याठिकाणी दोन्ही गटांकडून रस्त्यावर येत दांडके, वीटा, दगड आणि बियरच्या बाटल्या फेकत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. परिसरातील रहिवासी या अचानक झालेल्या टोळी युद्धामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. तर हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी असल्याने तात्काळ घटनास्थळी पोलीस पोहचले, तरीही दोन्ही गट एकमेकांना शिवीगाळ करत होते. यावेळी पोलीसांनी थेट गुन्हा दाखल करत संशयितांना ताब्यात घेत कारवाई केली.

दुसरी घटना

रविवारी (दि.२) रात्री गजानन चौकात गोळीबाराच्या घटनेने पुन्हा एकदा पंचवटी हादरले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गजानन चौक परिसरात रविवार (दि.२) रात्री १०:३० वाजेच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान हाणामारीची घटना घडली असून परस्पर विरोधी पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेला जून्या वादाची किनार असल्याचे समोर आली आहे.

हरदिपसिंग औलक (वय २७, रा. रेणू अपार्टमेंट, नागचौक, पंचवटी) यानी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, औलक हे गजानन चौकाकडून आपल्या घराकडे पायी जात असताना योगेश, साहिल उर्फ इटली, सोहम जोशी, राहुल कानडे व इतर चार ते पाच साथीदार यांनी हरदिपसिंग औलक यांना थांबवत मागील भांडणाची कुरापत काढली. यावेळी संशयित आरोपी साहिल उर्फ इटली याने तुझा काटा काढतो म्हणत फिर्यादीच्या डोक्यावर धारदार हत्याराने मारहाण करत गंभीर दुखापत केली. सोहन जोशी व राहुल कानडे यांनी देखील फिर्यादीच्या उजव्या भुवईजवळ हातातील दगडाने मारत ईजा केली. तसेच योगेश व इतर साथीदारांनी औलक यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी झालेल्या आरडाओरडीमुळे लोक जमल्याने मारेकरी पळून गेले.

योगेश जगन मोरकर (वय ३१, रा. जोशीवाडा, नागचौक, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, ऋषिकेश उर्फ सोंडंग्या गरड, रूपेश उर्फ वाळ्या गरड, नितीन जाधव, हरदिपसिंग औलक व हर्षल यांनी फिर्यादी गल्लीत क्रिकेट खेळत असताना रूपेश उर्फ वाळ्या गरड याने वाद घालत बॅट हिसकावून घेतली. तर ऋषिकेश उर्फ सोंडंग्या गरड याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याचे कमरेला लावलेला कट्टा बाहेर काढत हवेत गोळीबार करत तूला मारून टाकतो असे बोलला. यावेळी फिर्यादीने हल्लेखोर ऋषिकेश याचा हात धरला असता त्याने फिर्यादी याला फरफटत नेत मोटार सायकलवरून पळून गेले. यावेळी दोन्ही गटांनी परस्पर विरोधी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले.

  • मालेगाव स्टॅण्ड येथे गोळीबारची घटना ऑक्टोबर महिन्यात झाली असली तरी अद्यापपावेतो आरोपींना अटक झालेली नाही. तर पेठरोड येथील पवार मळा परिसरात सराईत सोनसाखळी चोराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
  • नागचौक ते गजानन चौकात झालेल्या टोळीयुद्धात पुन्हा एकदा गावठी कट्ट्यातून गोळीबारची घटना घडल्याने शहरात अवैध कट्टे वापरले जात असल्याचे अधोरेखित झाले आहे.
  • काही वर्षांपूर्वी पंचवटीत केबलच्या वादातून टोळीयुद्ध घडले होते. मात्र, तत्कालीन पोलीस अधिकार्‍यांनी या टोळ्यांना जेरबंद करत पंचवटी शांत केली होती. दरम्यान, काही महिन्यांपासून पंचवटीत पुन्हा एकदा टोळ्यांनी डोकेवर काढण्यास सुरुवात केली असल्याने परिसरात अशांतता पसरली आहे.



Source link

Comments are closed.