अमेरिकेत व्हाईट हाऊसजवळ गोळीबार, पोलिसांनी अनेक ब्लॉक्स केले बंद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये व्हाइट हाऊसच्या जवळ गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. रविवारी पहाटे व्हाइट हाऊसच्या समोर असलेल्या लाफायेट पार्कजवळ हा गोळीबार झाला. सुदैवाने, या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र गोळीबार करणारा संशयित अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर व्हाइट हाऊसच्या सुरक्षेमध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे.

टीव्ही९ भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील अनेक ब्लॉक बंद केले आहेत. सीक्रेट सर्विसने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची टीम मेट्रोपोलिटन पोलीस विभाग आणि यू.एस. पार्क पोलिसांच्या मदतीने एका संशयित व्यक्ती आणि वाहनाचा शोध घेत आहे. अद्याप कोणाचीही ओळख पटलेली नाही आणि हा गोळीबार कोणत्या उद्देशाने करण्यात आला, हेदेखील स्पष्ट झालेले नाही. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते लाफायेट पार्क गेल्या काही आठवड्यांपासून दुरुस्तीच्या कामासाठी बंद असून तिथे बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहे.

ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये होते. दरम्यान, ट्रम्प यांच्या सुरक्षेबाबत गेल्या काही दिवसांत अनेक चिंताजनक घटना समोर आल्या आहेत. ट्रम्प यांच्यावर यापूर्वीही हल्ल्याचे प्रयत्न झाले आहेत. सध्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

Comments are closed.