ज्ञानेश कुमार देशाचे गद्दार आहेत, निवडणूक आयोगाविरोधात उद्या आंदोलन करणारच – अभिजीत दीपके
निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलनाची घोषणा करणारे, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मुंबई प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेतली. उद्या 2 ऑक्टोबरला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आंदोलन करण्यावर दीपके यांनी ठाम असल्याचे म्हटले आहे. या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तसेच स्थानिक नागरिकांकडूनही आंदोलनाला विरोध करण्यात आला आहे. मात्र, परवानगी नसतानाही आंदोलन करण्याचा निर्धार दीपके यांनी व्यक्त केला आहे. ज्ञानेश कुमार हे देशाचे गद्दार आहेत. त्यांच्यावर क्रिमिनल चार्जेस लावायला हवेत,” असा थेट आरोप यावेळी दीपके यांनी केला.
आपल्या आंदोलनाच्या भूमिकेचे समर्थन करताना दीपके म्हणाले, “आम्ही लोकशाहीला मानतो. संविधानाने आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे.” सरकारने कारवाई केली तरी आंदोलन थांबणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “मुख्यमंत्री साहेब, तीन दिवस नाही तर तीन महिने जेलमध्ये टाका. मी रस्त्यावर पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन,” असे आव्हानही पत्रकार परिषदेमध्ये दीपके यांनी दिले.
शिवाजी पार्कमध्ये आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित केला. “देवेंद्र फडणवीस शिवाजी पार्कवर रॅली करू शकतात, मग आम्ही आंदोलन करू शकत नाही का?” असा प्रश्न त्यांनी विचारला.
एसआयआर प्रक्रियेत कथित अनियमितता आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावरून दीपके यांनी यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राजीनामा न दिल्यास देशभरामध्ये आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान, आंदोलनाला कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल, असे सांगत दीपके यांनी नागरिकांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. “कुठल्याही पार्टीचे झेंडे न आणता तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकता,” असे ते म्हणाले.
Comments are closed.