प्रणॉयचा झुंजार विजय

हिंदुस्थानचा स्टार खेळाडू एच. एस. प्रणॉयने पिछाडीवरून जबरदस्त पुनरागमन करत चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. बीडब्ल्यूएफ सुपर 1000 दर्जाच्या या स्पर्धेत मंगळवारी त्याने ही कामगिरी केली.
जागतिक क्रमवारीत 35 व्या स्थानी असलेल्या एच. एस. प्रणॉयने 18व्या मानांकित जपानच्या कोकी वतानाबे याच्यावर 8-21, 21-16, 23-21 असा थरारक विजय मिळवला. एक तासाच्या आत त्याने हा संघर्षमय सामना जिंकला. पहिला गेम सहज गमावल्यानंतर दुसऱया गेममध्ये प्रणॉयने लय सापडवत सामना बरोबरीत आणला. निर्णायक तिसऱया गेममध्ये तो 9 गुणांनी पिछाडीवर होता, मात्र त्यानंतर पाच मॅच पॉइंट वाचवत त्याने विजयावर शिक्कामोर्तब करत प्रेक्षकांना अचंबित केले. आता आगामी लढतीत प्रणॉयची लढत सहाव्या मानांकित चिनी तैपेईच्या चोऊ तिएन चेन याच्याशी होणार आहे.
दरम्यान, अन्य सामन्यांमध्ये लक्ष्य सेन, अनुपमा उपाध्याय यांच्यासह रोहन कपूर-ऋत्विका गड्डे या मिश्र दुहेरी जोडीला निर्णायक गेमपर्यंत झुंज दिल्यानंतर पराभवाचा सामना करावा लागला आहे. लक्ष्य सेनला सलामीच्या लढतीत चीनच्या ली शिफेंग याने 14-21, 24-22, 21-11 असे पराभूत केले. महिला एकेरीच्या लढतीत अनुपमा उपाध्याय हिला चीनच्या लिन ह्सियांग-ती हिने 23-21, 21-11, 21-10 असे हरवले.
Comments are closed.