अक्षय-सैफची जोडी पुन्हा सुपरहिट! ‘हैवान’ची पहिल्या दिवशी 4.60 कोटींची कमाई
अभिनेता अक्षय कुमार आणि सैफ अली खान या बॉलिवूडच्या सुपरहिट जोडीने ब्लॉकबस्टर ‘हैवान’ चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. तब्बल 17 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र आलेल्या या जोडीचा जलवा पहिल्याच दिवशी पाहायला मिळाला असून ‘हैवान’ने पहिल्या दिवशी तब्बल 4.60 कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज सुरुवात केली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले आहे, जे हेरा फेरी, हलचल, भूल भुलैया आणि हंगामा यांसारख्या हिट विनोदी चित्रपटांसाठी ओळखले जातात. या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय कुमार आणि सैफ अली खान तब्बल 17 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आहेत. यापूर्वी त्यांनी मै खिलाडी तू अनाडी, टशन, आरझू, तू चोर मै सिपाही आणि कीमत यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. हे दोन्ही कलाकार शेवटी 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या टशन या ॲक्शन चित्रपटात एकत्र दिसून आले होते. ज्यामध्ये करीना कपूर खान आणि अनिल कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.
व्यावसायिक आकडेवारीवर लक्ष ठेवणाऱ्या सॅक्निल्क या संकेतस्थळानुसार, शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने हिंदुस्थानी बॉक्स ऑफिसवर 3.60 कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केले असून परदेशात 1 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
या चित्रपटात अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्यासोबत बोमन इराणी, सयामी खेर आणि श्रिया पिळगावकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती वेंकट के. नारायण आणि शैलजा देसाई फेन यांनी केली आहे. अक्षय आणि सैफची जुगलबंदी, सस्पेन्स आणि थरारक कथानक यामुळे या चित्रपटाने पहिल्या दिवशी प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित केले आहे.
Comments are closed.