’ओव्हरलोड’ वाहतुकीने लागली रस्त्याची ’वाट’, हलकर्णी-गडहिंग्लज रस्ता खाचखळग्यांनी भरला
संतोष नाईक, गडहिंग्लज
हलकर्णी ते गडहिंग्लज (बेरडवाडीमार्गे) रस्ता वर्षभरातच ठिकठिकाणी खचला असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. कुंबळहाळ, नंदनवाडपर्यंतच्या रस्त्याची मोठी धूळधाण उडाली आहे. ओव्हरलोड अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याची पूर्णतः वाट लागली आहे. मात्र, संबंधित खात्याने याकडे दुर्लक्ष केले असून, एखादा मोठा अपघात घडल्यानंतरच याकडे लक्ष देणार का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. त्यामुळे तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे.
गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील हलकर्णी परिसराला जोडण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. या मार्गाचे वर्षभरापूर्वीच हसुरवाडीपर्यंत रुंदीकरणासह डांबरीकरण करण्यात आले. हा रस्ता सुस्थितीत होता. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यावर ओव्हरलोड अवजड वाहतूक सुरू असल्याने बऱ्याच ठिकाणी हा रस्ता खचला आहे. काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हलकर्णी-कुबळहाळ – नंदनवाड या गावांपर्यंतचा रस्ता वाहतुकीस अतिधोकादायक बनला आहे. या ठिकाणी रस्ता खचला असून, मोठय़ा आकाराचे खड्डे पडले आहेत. एवढय़ा अंतरात प्रवास करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. खड्डय़ात पावसाचे पाणी साचले असून, सर्वत्र चिखल झाला आहे. पादचाऱयांना या रस्त्यावरून चालताना मोठी कसरत करावी लागत आहे. तर, रात्री या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देणे अशी अवस्था आहे. गेल्या महिन्याभरात या ठिकाणी दुचाकी घसरून बरेच अपघात घडले आहेत.
हसुरवाडीपर्यंत या रस्त्यावरील मोऱयांवर खड्डे पडले आहेत. नरेवाडी व हिडदुगी गावांच्या हद्दीतील ओढय़ांवरील रस्त्याचे डांबर निघाले असून, खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे. दररोज खड्डय़ांची संख्या वाढत असल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज बांधणे कठीण होत आहे. काही दिवसांपासून खडी वाहतुकीच्या अवजड वाहनांमुळे हा रस्ता खचल्याचे सांगितले जात आहे.
ऊसवाहतूक सुरू झाल्यानंतर पुन्हा धोका वाढणार
या रस्त्याची वेळीच दुरुस्ती न केल्यास भविष्यात ऊसतोड हंगाम सुरू झाल्यानंतर या रस्त्यावरून ट्रक्टर व ट्रकने ऊस वाहतूक करणे धोक्याचे ठरणार आहे. या रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ राहिल्यास ट्रक्टर ट्रॉली उलटून अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी ऊस वाहतुकीसमोरदेखील या रस्त्याची अडचण निर्माण होणार आहे.
रस्त्यात खड्डेलागूनच विहीर
नंदनवाडजवळ खड्डे पडलेल्या रस्त्याला लागूनच विहीर आहे. या विहिरीला संरक्षक कठडा नसल्याने येथून वाहने चालवणे धोक्याचे आहे. खड्डय़ांशी कसरत करत असताना, वाहनांचा तोल विहिरीच्या बाजूने जात आहे. त्यामुळे संबंधित खाते अपघात घडल्यानंतर जागे होणार का? असा सवाल व्यक्त होत आहे.
Comments are closed.