16 कसोटी सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूने घेतला संघ सोडण्याचा निर्णय, बोर्डाकडून मागितली NOC

हनुमा विहारी आंध्राकडून एनओसी शोधतो: भारताचा स्टार क्रिकेटपटू हनुमा विहारी आगामी घरगुती हंगामाआधी आंध्र संघाला रामराम ठोकणार असल्याची शक्यता आहे. येत्या देशांतर्गत हंगामामध्ये तो नव्या संघासाठी खेळताना दिसू शकतो. टीम इंडियासाठी 16 कसोटी सामने खेळलेला विहारीने आंध्र क्रिकेट असोसिएशनकडून (Andhra Cricket Association) एनओसीची मागणी केली आहे. अलीकडेच तो आंध्र प्रीमियर लीगमध्ये अमरावती रॉयल्सकडून खेळला होता आणि आपल्या संघाला अंतिम फेरीत पोहोचवले होते.

त्रिपुराकडून मिळणार कर्णधारपद?

क्रिकबझशी बोलताना विहारी म्हणाला, “मी राज्य बदलण्याचा विचार केला आहे. त्रिपुरा माझ्याशी काही काळापासून संपर्क साधत आहे.” त्याने आंध्रकडून एनओसी (NOC) मागितल्याचीही पुष्टी केली. त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनच्या (TCA) अधिकाऱ्यांनीही ही बाब मान्य केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, या हंगामासाठी विहारीला व्यावसायिक खेळाडू म्हणून घेण्याचा निर्णय झाला आहे आणि त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. त्रिपुरा आगामी हंगामात सर्व फॉरमॅट्समध्ये (रेड बॉल आणि व्हाईट बॉल) खेळणार आहे.

त्रिपुराचे माजी अध्यक्ष तसेच विद्यमान सदस्य तपन लोढा यांनी क्रिकबझशी बोलताना सांगितले की, “आम्ही काही नावं व्यावसायिक खेळाडू म्हणून सुचवली आहेत. नावं जाहीर करू शकत नाही, पण विहारीला आम्ही साइन करत आहोत हे निश्चित आहे.”

डोमेस्टिक क्रिकेटमधील हनुमा विहारीचे करिअर

विहारी हा देशांतर्गत क्रिकेटमधला अनुभवी फलंदाज मानला जातो. आत्तापर्यंत त्याने 131 फर्स्ट-क्लास सामने खेळले आहेत. त्यापैकी 44 सामने त्याने आंध्रकडून खेळले असून, 44.97 च्या सरासरीने 3013 धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून 4 शतके आणि 20 अर्धशतके झळकली.

हैदराबादसाठी खेळताना त्याने 40 सामने खेळले आणि तब्बल 57.38 च्या जबरदस्त सरासरीने 3155 धावा फटकावल्या. यामध्ये 10 शतके आणि 12 अर्धशतके आहेत. पुन्हा आंध्र संघाचे नेतृत्वही त्याने केले होते, परंतु 2024 मध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे त्याला वादग्रस्त पद्धतीने कर्णधारपदावरून हटवण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर, हनुमा विहारीने भारताकडून 16 कसोटी सामने खेळले असून, 33.56 च्या सरासरीने 839 धावा केल्या आहेत.

15 वर्षांत चौथ्यांदा संघबदल…

हनुमा विहारीने आपल्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात आंध्र क्रिकेट असोसिएशनकडून केली होती. त्यानंतर त्याने हैदराबादचे प्रतिनिधित्व केले. काही काळाने पुन्हा तो आंध्र संघात परतला. आता मात्र तो आणखी एकदा संघ बदलणार असून यावेळी त्रिपुरा संघासाठी खेळणार आहे. इतकेच नव्हे तर त्रिपुराच्या संघाचे नेतृत्वही त्याच्याकडे सोपवले जाणार आहे.

हे ही वाचा –

Avneet kaur-Virat Kohli : बस प्यार मिलता रहना चाहिए…; विराट कोहलीच्या LIKE नंतर अवनीत कौरच्या विधानाची चर्चा

आणखी वाचा

Comments are closed.