हनुमानगडीचे महंत संत रामदास यांचे निधन.

वृत्तसंस्था/ अयोध्या

अयोध्येतील प्रसिद्ध हनुमानगढी मंदिराचे महंत संत रामदास यांचे शनिवार, 27 जून रोजी वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. संत रामदास हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सर्वात जवळच्या महंतांपैकी एक होते. त्यांच्या निधनामुळे संत समुदाय आणि भक्तांमध्ये शोककळा पसरली आहे. शिष्य राजू दास यांनी सोशल मीडियावर रुग्णालयातील एक फोटो शेअर करत संत रामदास यांच्या निधनाची माहिती सर्वदूर केली. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी 4 वाजता सरयू नदीच्या काठावरील नया घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

महंत संत रामदास यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. गेल्या आठ महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना नुकतेच मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवसांपूर्वी उपचारानंतर ते अयोध्येत परतले होते. आता त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे. उज्जैनिया पट्टीचे महंत संत रामदास यांचे निधन हे अयोध्येतील संत समुदायासाठी कधीही भरून न येणारे नुकसान मानले जात आहे.

मुख्यमंत्री योगी यांनी हनुमानगढी अयोध्या धामचे महंत संत रामदास यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. अयोध्या वास्तव्यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या आश्रमाला वारंवार भेट देत असत आणि त्यांना गदा व रामनामा देऊन सन्मानित करत असत.

Comments are closed.