आशिया कपमध्ये भारत-पाक सामना नको, हरभजन सिंगनं घेतला ठाम पवित्रा

पुढच्या महिन्यात 9 सप्टेंबरपासून आशिया कप क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना 10 तारखेला संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध तर 14 सप्टेंबरला चिरप्रतिद्वंद्वी पाकिस्तानशी होणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्याच्या प्रत्युत्तरात भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास विरोधाचा सूर चढू लागला आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी ही मागणी संसदेत उपस्थित केली होती. तर एक दिवस आधीच शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांनी बीसीसीआय आणि सरकारवर टीका केली होती. आता माजी दिग्गज ऑफ-स्पिनर व आम आदमी पक्षाचा राज्यसभा खासदार हरभजन सिंगनेही अशीच मागणी केली आहे.

एका इंग्रजी न्यूज वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत हरभजन म्हणाला, “भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांचा बहिष्कार करावा. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत. आपण त्यांना इतकं महत्त्व का देतो? आपल्या जवानांचे प्राण जातात आणि आपण क्रिकेट खेळायला जातो.”

अलीकडेच झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्समध्ये इंडिया लिजेंड्सच्या संघात हरभजन सिंग होता. संघाने पाकिस्तान लिजेंड्सविरुद्ध केवळ लीग फेरीच नव्हे, तर उपांत्य फेरीचाही बहिष्कार केला होता. या संघात युवराज सिंग, शिखर धवन, इरफान पठाण, युसुफ पठाण, सुरेश रैना यांसारखे माजी दिग्गज खेळाडू होते. या खेळाडूंनी स्पष्ट सांगितले होते की त्यांच्यासाठी देश सर्वात महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी उपांत्य फेरी काय, अंतिम फेरी असली तरी पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाहीत. मात्र, डब्ल्यूसीएल ही एक खाजगी लीग होती.

मुलाखतीत जेव्हा हरभजन सिंगला विचारण्यात आले की आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना बहिष्कृत करावा का, तेव्हा त्याने सीमारेषेवर तैनात जवानांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा उल्लेख केला. तो म्हणाला, “माझ्यासाठी देशाचा तो जवान सर्वात महत्त्वाचा आहे, जो सीमारेषेवर उभा आहे. त्यांचे कुटुंबीय त्यांना अनेकदा भेटू शकत नाहीत, कधी कधी ते परत घरीही येत नाहीत. त्यांचे बलिदान आपल्या सगळ्यांसाठी असते. अशा वेळी क्रिकेटचा एक सामना सोडणे ही खूप छोटी गोष्ट आहे.”

हरभजन सिंगने पुढे सांगितले की, “आपल्या सरकारचाही हा ठाम दृष्टिकोन आहे की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत. देश सर्वात आधी येतो. क्रिकेट सामना न खेळणे ही देशाच्या तुलनेत अत्यंत किरकोळ गोष्ट आहे.” त्याने आशा व्यक्त केली की सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळणार नाही.

सध्या तरी भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध सामना बहिष्कृत करेल, असे कोणतेही संकेत दिसत नाहीत. दोन्ही देशांमध्ये खेळ संबंध बऱ्याच वर्षांपासून तुटलेले आहेत. द्विपक्षीय मालिका होत नाहीत, पण बहुपक्षीय स्पर्धांमध्ये मात्र सामना होतो. एकमेकांच्या भूमीवर खेळणे टाळले जाते, विशेषत: भारत आयसीसी स्पर्धेतही पाकिस्तानमध्ये खेळत नाही. त्यामुळे दोघांचे सामने प्रामुख्याने तटस्थ स्थळी होतात.

Comments are closed.