गौतम गंभीरवर होत असलेल्या टीकेचं आश्चर्य वाटतंय… हरभजन सिंगने टीकाकारांना सुनावलं
टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर बरीच टीका झाली. मात्र, गौतम गंभीरवर होत असलेल्या टीकेवर टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच टीकाकारांना सडेतोड उत्तर देत गौतम गंभीरच्या आक्रमक आणि स्पष्टवक्ता स्वभावाचही समर्थन केलं आहे.
संघाच्या खराब कामगिरीसाठी नेहमी प्रशिक्षकालाच का जबाबदार धरलं जातं, असा सवाल हरभजन सिंगने उपस्थित केला आहे. हरभजन सिंगने एका मुलाखतीत सांगितले की, मी गौतमला जितके ओळखतो, त्यानुसार तो अत्यंत भावूक आणि जुन्या काळातील जोश व मनात जिद्द असलेला खेळाडू आहे, जो नेहमी संघाला प्राधान्य देतो. तो अत्यंत स्पष्टवक्ता असून त्याची कडवट सत्य सांगण्याची शैली अनेकांना आवडत नाही. लोक अनेकदा सत्य पचवू शकत नाहीत आणि त्याच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे अनेकांना तो कठोर वाटू शकतो, असेही हरभजन म्हणाला.
गंभीरच्या मानसिकतेबद्दल बोलताना हरभजन पुढे म्हणाला की, गौतम हा असा माणूस आहे ज्याला केवळ सामना जिंकण्याच्या उद्देशाने खेळायचे असते. पराभवासोबत त्याची कोणतीही अडचण नसते, परंतु जर एखादा संघ विजयाऐवजी केवळ सामना अनिर्णित (ड्रॉ) ठेवण्यासाठी खेळत असेल, तर ते त्याला अजिबात मान्य असणार नाही, असे मत त्याने व्यक्त केले.
Comments are closed.