हार्बरचे बोरिवलीपर्यंत विस्तारीकरण लटकले, काम पूर्ण होण्यास आणखी अडीच वर्षे लागणार
हार्बर रेल्वे मार्गाचा बोरिवली स्थानकापर्यंत विस्तार करण्याचा प्रकल्प भूसंपादनाच्या कचाटय़ात खोळंबला आहे. अतिरिक्त रेल्वे मार्गिकांसाठी आवश्यक कांदिवली येथील जागेच्या संपादनाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. त्यामुळे हार्बरचा बोरिवलीपर्यंत विस्तार करण्यास डिसेंबर 2027 उजाडणार आहे. रेल्वेने ही डेडलाइन डोळय़ापुढे ठेवली असली तरी कामाला आणखी विलंब होऊ शकतो, असे मत रेल्वे तज्ञांनी व्यक्त केले आहे.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अंधेरीच्या पुढे गोरेगावपर्यंत हार्बरचा विस्तार करण्यात आला. त्यावेळी पुढच्या एक-दोन वर्षांत बोरिवलीपर्यंत हार्बरच्या लोकल ट्रेन धावतील अशी अपेक्षा होती, मात्र मालाड आणि कांदिवली स्थानकांदरम्यान मार्गिकांसाठी आवश्यक जागा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे विस्तारीकरणाचे काम रेंगाळून सध्या ते मालाडपर्यंत पूर्ण झाले आहे. कांदिवली पूर्वेकडील जागा संपादित करण्याचा मोठा प्रश्न असल्याचे पश्चिम रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. प्रकल्प बाधितांशी यशस्वी चर्चा झाल्यानंतर प्रत्यक्ष काम मार्गी लागेल, असे हा अधिकारी म्हणाला.
सात वर्षांपासून रखडपट्टी
सध्या सीएसएमटी ते गोरेगावदरम्यान लोकल धावत आहेत. हार्बर मार्गाचा अंधेरी ते गोरेगावपर्यंतचा शेवटचा विस्तार 2018 मध्ये पूर्ण करण्यात आला, मात्र त्यापुढील काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. मागील सात वर्षांपासून कामाची रखडपट्टी झाली आहे.
गोरेगाव ते बोरिवलीपर्यंत हार्बर रेल्वेच्या अतिरिक्त मार्गिका आणि स्थानकांच्या कामासाठी 825 कोटींहून अधिक खर्च केला जाणार.
गोरेगाव ते मालाडदरम्यान 2 किमीचा पहिला टप्पा आणि मालाड ते बोरिवलीपर्यंत 5 किमीचा दुसरा टप्पा अशाप्रकारे हार्बर विस्तारीकरण प्रकल्पाचे काम करण्यात येईल.
Comments are closed.