हरदीप पुरी यांचे सडेतोड उत्तर

एपस्टिन फाईल्ससंबंधी घेतला गांधी यांचा समाचार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

एपस्टिन फाईल्ससंबंधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या आरोपांना केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांची चोख प्रत्युत्तर दिले आहे. एपस्टिन याच्या कोणत्याही बेकायदशीर अथवा अनैतिक व्यवहारांशी आपला संबंध नाही. राहुल गांधी यांनी या संदर्भात केलेला प्रत्येक आरोप बिनबुडाचा असून केवळ चिखलफेक करण्यासाठी गांधी यांनी ते केले आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.

एपस्टिनसंबंधी 30 लाख ईमेल्स प्रसिद्ध करण्यात आले आहेत. 2009 पासून मी अमेरिकेत आठ वर्षे वास्तव्यास होतो. 2009 मध्ये मी भारताचा संयुक्त राष्ट्रसंघातला राजदूत होतो. त्यानंतर काही महिन्यांमध्ये मी निवृत्त झालो. नंतर मला आंतरराष्ट्रीय शांतता समितीचा सदस्य होण्यासाठी आमंत्रण देण्यात आले होते. या काळात मी तीन ते चार वेळा एपस्टिन याला भेटलो होतो. तथापि, या भेटी केवळ व्यावसायिक कारणांसाठी होत्या. त्यांचा एपस्टिन याच्या कोणत्याही वैध अगर अवैध व्यवहारांशी कोणताही संबंध नाही. तसेच माझा उल्लेख केवळ एक दोन ईमेल्समध्ये अप्रत्यक्षरित्या करण्यात आला आहे. यातून कोणताही आरोप सिद्ध होत नाही. राहुल गांधी यांचे आरोप हे केवळ राजकीय चिखलफेक करण्यासाठी आहेत. माझी प्रतिमा बिघडविण्यासाठी ते करण्यात येत आहेत. त्या काळात माझे केवळ एपस्टिन नव्हे, तर जगातील अनेक विख्यात लोकांशी संपर्क आलेले होते. केवळ संपर्क आला, याचा अर्थ एपस्टिन याच्या कारनाम्यांशी मी संबंधित होतो, असा आरोप करणे हास्यास्पद आहे, असे प्रत्युत्तर हरदीप पुरी यांनी दिले आहे.

रीड हॉफमनचा संबंध

अमेरिकेतील वास्तव्यात माझा रीड हॉफमन याच्याशी संबंध आला. तो एक व्यावसायिक आहे. हॉफमन याला मी एक ईमेल केला होता. त्याच ईमेलची कॉपी एपस्टिन याने केली. त्यावरुन कोणताही आरोप सिद्ध होत नाही. कारण कोणतेही बेकायदेशीर किंवा अनैतिक कृत्य मी केलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या हा विषय सोशल मिडियावर बराच चर्चेत आहे. त्याचाच संदर्भ घेत राहुल गांधी यांनी हरदीप पुरी यांच्यावर लोकसभेतील भाषणात काही आरोप केले होते.

Comments are closed.