दुखापतीच्या कारणामुळे हार्दिक संघातून 'आऊट'? मुंबई इंडियन्स कुंग-फू पांड्याविनाच रायपूरला रवाना
आयपीएल २०२६ चा हंगाम मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार हार्दिक पांड्यासाठी निराशाजनक ठरत आहे. तो नेतृत्वाबरोबर खेळाडू म्हणूनही विशेष कामगिरी करु शकला नाही. मुंबईचा पुढील सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध असून तो १० मे ला रायपूरमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्याला हार्दिक मुकण्याची शक्यता आहे, कारण तो या सामन्यासाठी संघासोबत गेलेला नाही.
हार्दिक लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्याला मुकला होता. तेव्हा त्याला पाठीची दुखापत झाली होती, यामुळे त्याच्याजागी सूर्यकुमार यादवने संघाचे नेतृत्व केले होते. ही माहिती फ्रॅंचायजीने अधिकृतपणे कळवली होती. यादवच्या नेतृत्वाखाली मुंबईने या सामन्यात स्पर्धेत आपले आव्हान कायम राखण्यासाठी आवश्यक विजय मिळवला होता. क्रिकबजच्या माहितीनुसार मुंबईचा संघ विमानतळावर जमला असता, हार्दिक त्यांच्यासोबत दिसला नाही. यामुळे हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार पुन्हा एकदा संघाचे कर्णधारपद भूषवू शकतो, असे वाटत असताना तोही संघासोबत रायपूरला गेला नाही. यामुळे हार्दिकबरोबर सूर्यकुमारही बंगळुरूविरुद्धच्या सामन्याला मुकण्याची दाट शक्यता आहे.
लखनऊ विरुद्ध मुंबईने सहा विकेट्सने सामना जिंकल्यानंतर सामनावीर ठरलेला रायन रिकल्टनने हार्दिक कधी परतणार याबद्दलचे वक्तव्य केले होते. तो म्हणाला, “तो कधी परत येईल हे मला माहित नाही. आज दुपारी मला त्याच्या दुखापतीबद्दल कळाले आणि त्याची तीव्रता किती हे माहित नाही. या आठवड्यात आम्ही रायपूरला जाणार असून तो संघासोबत असणार याची खात्री आहे.”
वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनऊने २२९ धावांचे लक्ष्य दिले होते. मुंबईने रोहित शर्मा आणि रायन यांच्या स्फोटक भागीदारीमुळे विजय निश्चित केला. त्यांचा हा या हंगामातील केवळ तिसराच विजय ठरला आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईला आता पुढील प्रत्येक सामन्यांमध्ये विजय आवश्यक आहे.
Comments are closed.