दुसऱ्या टी-20 मध्ये हार्दिक पांड्या रचणार मोठा इतिहास! हा विक्रम करणारा ठरणार पहिला भारतीय खेळाडू

हार्दिक पांड्याचं (Hardik pandya) दुखापतीनंतरचं पुनरागमन खूपच धमाकेदार ठरलं आहे. कटक (Cuttack) येथील पहिल्या टी-20 सामन्यात हार्दिकने बॅट आणि बॉल दोन्हीने उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. ज्या खेळपट्टीवर फलंदाज धावा करण्यासाठी धडपडत होते, त्याच मैदानावर पांड्याने फक्त 28 चेंडूत 59 धावांची वेगवान खेळी केली. गोलंदाजीतही हार्दिकने फक्त 16 धावा देत डेव्हिड मिलरसारख्या मोठ्या फलंदाजाची विकेट मिळवली.

आता मुल्लांपूर (Mullanpur) येथे होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यातही हार्दिक आपली दमदार कामगिरी कायम ठेवण्यासाठी उत्सुक असेल. जर हार्दिकने पहिल्या सामन्याप्रमाणेच कामगिरी पुन्हा केली, तर तो एका ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घालेल. जगात फक्त दोनच खेळाडूंनी हा विक्रम केला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हार्दिकने आतापर्यंत 121 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 1919 धावा केल्या आहेत आणि 99 विकेट्स घेतल्या आहेत.

दुसऱ्या टी-20 मध्ये जर हार्दिकने 81 धावा आणि एक विकेट घेतली, तर तो टी-20 फॉरमॅटमध्ये 2000 धावा आणि 100 विकेट्स घेणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू बनेल. जागतिक क्रिकेटमध्ये हार्दिकपूर्वी हा पराक्रम केवळ शाकिब अल हसन आणि मोहम्मद नबी यांनीच केला आहे.

एक विकेट घेताच हार्दिक पांड्या आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 100 विकेट्स पूर्ण करेल. हा टप्पा गाठणारा तो भारताकडून तिसरा गोलंदाज बनेल. पहिल्या टी-20 मध्ये जसप्रीत बुमराहने डेवाल्ड ब्रेव्हिसला बाद करून हा विक्रम आपल्या नावावर केला होता. अर्शदीप सिंग (107 विकेट्स) आघाडीवर आहे, तर बुमराह (101 विकेट्स) दुसऱ्या स्थानावर आहे.

Comments are closed.