हरजस सिंगचे त्रिशतकी वादळ, 141 चेंडूंत 35 षटकारांसह 314 धावांचा पाऊस

ट्रव्हिस हेडच्या झंझावाती पावलांवर पावले टाकण्याची किमया हरजस सिंगने करून दाखवली आहे. 19 वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या संघातील हरजस सिंगने वन डे सामन्यात केवळ 141 चेंडूंमध्ये नाबाद 314 धावा ठोकत क्रिकेटविश्वात खळबळ उडवली. या खेळीत त्याने तब्बल 35 षटकार आणि 14 चौकार ठोकण्याचा पराक्रम केला.
सिडनी प्रीमियर क्रिकेटमधील ‘ग्रेड’ स्पर्धेत वेस्टर्न सबर्ब्स क्लबकडून खेळताना हरजसने 50 षटकांच्या या सामन्यात वेस्टर्न सबर्ब्सने 5 बाद 483 धावा फटकावत ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित क्रिकेटच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली.
त्रिशतक अन् विक्रमांचा पाऊस
हरजस सिंगने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सुरुवातीला संयम दाखवला. त्याने आपले शतक 74 चेंडूंमध्ये पूर्ण केले, पण त्यानंतरच्या 67 चेंडूंमध्ये तब्बल 214 धावा झळकावल्या. 37 व्या षटकात त्याने थॉमस मलानच्या गोलंदाजीवर सलग पाच षटकार ठोकले. एवढंच नव्हे, तर त्याचे 10 फटके थेट मैदानाबाहेर गेले. या अद्भुत डावामुळे हरजस सिंग सिडनी फर्स्ट ग्रेड क्रिकेट इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी वैयक्तिक खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी विक्टर ट्रम्परने 1903 मध्ये 335 धावा आणि फिल जॅक्सने 2006 मध्ये 321 धावा केल्या होत्या.
Comments are closed.