हरलीन देओलला रिटायर्ड आऊट केल्यावर हरमनप्रीत कौरही चकित; म्हणाली- 'मीही हैराण झाले होते की….'
14 जानेवारी रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात यूपी वॉरियर्सच्या संघ व्यवस्थापनाने संघहिताचा निर्णय घेत हरलीन देओलला रिटायर्ड आऊट घोषित केलं होतं. त्या वेळी हरलीन अर्धशतकाच्या अगदी जवळ होती. हा निर्णय धोरणात्मक असला तरी त्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा आणि टीका झाली. हरलीन स्वतःही त्या क्षणी निराश आणि भावुक दिसली होती.
मात्र 15 जानेवारी रोजी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात हरलीन देओलने आपल्या बॅटनेच सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तिने केवळ 39 चेंडूत नाबाद 64 धावांची शानदार खेळी साकारली. या खेळीत 12 चौकारांचा समावेश होता. तिच्या या मॅच-विनिंग खेळीमुळे यूपी वॉरियर्सने सामना 7 विकेट्सने आणि 11 चेंडू राखून जिंकला.
सामन्यानंतर हरलीन भावूक झालेली दिसली. विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरनेही हरलीनच्या खेळीचं भरभरून कौतुक केलं. हरमनप्रीत म्हणाली, “हरलीनने आज सिद्ध केलं की ती संघात का आहे आणि संघासाठी काय करू शकते. तिने खूप सकारात्मक विचारसरणीने फलंदाजी केली. मागील सामन्यात तिला रिटायर्ड आऊट होताना पाहून मलाही आश्चर्य वाटलं होतं, पण आज तिने अप्रतिम कमबॅक केला.”
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत यूपीसमोर 161 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हरमनप्रीतच्या मते, हा स्कोर अपुरा ठरला. “या खेळपट्टीवर 180 धावा तरी हव्या होत्या. ओस असल्यामुळे चेस करणं सोपं झालं आणि त्याचा फायदा यूपीला झाला,” असं तिनं सांगितलं.
या विजयासह यूपी वॉरियर्सने स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. त्याचबरोबर, हरलीन देओलने दबावाखाली खेळत सामना जिंकून देण्याची आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली. रिटायर्ड आऊटनंतरचं हे पुनरागमन केवळ विजयापुरतंच नव्हे, तर तिच्या आत्मविश्वासासाठीही महत्त्वाचं ठरलं आहे.
Comments are closed.