भारत-विरुद्धच्या उपांत्य फेरीपूर्वी हॅरी ब्रूकचे मोठे विधान; टीम इंडियाला दिले खुले आव्हान!

भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी, ५ मार्च रोजी T20 विश्वचषक 2026 चा दुसरा उपांत्य फेरीचा (सेमीफायनल) सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया या सामन्यात विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. मात्र, भारतीय संघासाठी इंग्लंडला हरवणे सोपे नसेल.

​इंग्लंडच्या संघाने सलग ५ सामने जिंकून उपांत्य फेरीत जागा मिळवली असून ते सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने भारतांविरुद्धच्या सामन्याबाबत मोठे विधान केले आहे.

​इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने भारताविरुद्धच्या टी-20 वर्ल्ड कप सेमीफायनलपूर्वी पत्रकार परिषदेत आपल्या संघाच्या तयारीबद्दल सविस्तर भाष्य केले. वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारताला त्यांच्याच घरात आव्हान देणे, ही कोणत्याही क्रिकेटपटूसाठी मोठी संधी असल्याचे ब्रूकने मान्य केले.

​तो म्हणाला, “आमच्यापैकी बहुतेकांसाठी भारतात भारताविरुद्ध वर्ल्ड कप सेमीफायनल खेळणे हे एखाद्या स्वप्नपूर्तीसारखे आहे. आम्ही आत्मविश्वासाने भरलेले आहोत. आम्ही चांगले क्रिकेट खेळलो आहोत. आशा आहे की उद्या आमचा खेळ शानदार होईल आणि आम्ही मोकळेपणाने खेळू. येथील वातावरण आणि दबाव या गोष्टी या सामन्याला अधिक खास बनवतात.”

​इंग्लंडचा सेमीफायनलपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. ग्रुप स्टेजमध्ये इंग्लंडने नेपाळ, स्कॉटलंड आणि इटलीविरुद्ध शानदार विजय मिळवला होता, पण वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, सुपर-8 मध्ये इंग्लंडने श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंडला पराभूत करून सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. कर्णधार ब्रूकच्या मते, “आम्ही अजून आमचे सर्वोत्तम प्रदर्शन केलेले नाही, पण मला वाटते की एक मोठा विजय आता फार दूर नाही.”

​तो पुढे म्हणाला की, संघाने अनेक कठीण परिस्थितीतून बाहेर पडून विजय मिळवला आहे, जे कोणत्याही वर्ल्ड कपमध्ये अत्यंत महत्त्वाचे असते. ब्रूकच्या मते, “आम्ही असेही सामने जिंकले आहेत जे कदाचित आम्ही जिंकायला नको होते, पण आतापर्यंत असे कधीच वाटले नाही की आम्ही पूर्णपणे पराभवाच्या उंबरठ्यावर उभे होतो.” संघ कधीही स्पर्धेतून बाहेर पडत नाही ही भावना इंग्लंडची सर्वात मोठी मानसिक ताकद आहे. मात्र, ब्रूकने स्पष्ट केले की, “नाही, आम्ही अजिंक्य नाही, पण दबावाखाली खेळताना संघाने आत्मविश्वास आणि स्वतःवरचा विश्वास संपादन केला आहे.”

Comments are closed.