लोकशाही व संविधान संरक्षणाची भूमिका घेणाऱ्या पक्षांना बरोबर घेऊन काँग्रेस भाजपाविरोधात लढत राहील: हर्षवर्धन सपकाळ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येत असतील तर त्यावर आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण यासंदर्भात काही ठोस समोर आल्यावरच त्यावर प्रतिक्रिया देणे उचित होईल. दुभंगलेले पक्ष, मने वा दोन भाऊ एकत्र येत असतील तर हरकत नाही. काँग्रेस पक्ष भारत जोडोचा विचार घेऊन पुढे जात आहे, सर्वांनी एकत्र येताना विभाजनवादी विचाराला मुठमाती दिली पाहिजे आणि लोकशाही व संविधानाचे संरक्षण व संवर्धन करण्याचा प्रयत्न जे पक्ष करतील त्यांच्यासोबत काँग्रेस असेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस पक्ष भाजपा विरोधात लढत आहे, शरद पवार हे इंडिया आघाडीचे एक महत्वाचे नेते आहेत, काही राजकीय घटना घडली तर त्यानंतर भूमिका घेता येईल. राज्यात महाविकास आघाडी म्हणून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर लोकसभा व विधानसभा निवडणुका आम्ही एकत्र लढलो आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निर्णय हे स्थानिक पातळीवर घेतले जातील असेही सपकाळ म्हणाले.

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरु केले असून सर्वांनी भारतीय लष्कराच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. काँग्रेस पक्षाने केंद्र सरकार सोबत असल्याचे जाहीर केले आहे. एकदिलाने एकसंध राहून दहशतवादाचा मुकाबला करून दहशतवाद समुळ संपवला पाहिजे. आपण २६/११ च्या हल्ल्याच्या वेळेस दुभंगलेला समाज पाहिला तसे यावेळी दिसत नाही हे विशेष महत्वाचे आहे. पाकिस्तानवरील हल्ल्याकडे राजकारणापलीकडे जाऊन पाहिले पाहिजे. काही जण दावे करून हवा देण्याचा प्रयत्न करत आहेत त्याची गरज नाही, चुकीच्या घटना टाळाव्यात असे आवाहनही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

Comments are closed.