संगीतविश्वावर 8 दशके अधिराज्य गाजवणारा चिरतरुण आवाज हरपला – हर्षवर्धन सपकाळ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आपल्या जादुई आवाजाने तब्बल 8 दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. 20 हून अधिक भाषांमध्ये 12 हजारांहून अधिक गाणी गाण्याचा विश्वविक्रम त्यांनी केला असून प्रत्येक वयातील व्यक्तीला आवडतील अशी गाणी त्यांनी गायली आहेत. आशाताईंच्या निधनाने जगाला भुरळ घालणारा चिरतरुण आवाज हरपला आहे, अशा शोकभावना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

आशाताईंच्या निधनावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, लतादिदी व आशाताई या मंगेशकर कुटुंबातील दोन स्वररत्नांनी वर्षानुवर्षे रसिकांना आपल्या अविट गाण्याने मंत्रमुग्ध केले. संगीतक्षेत्रात त्यांनी आपला दबदबा निर्माण केला होता पण यशाचे हे शिखर गाठण्यासाठी त्यांना लहानपणापासून खूप कष्ट करावे लागले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी लहान वयातच त्यांनी गायनाला सुरुवात केली होती, त्यांनी आपल्या मेहनतीने संगीत क्षेत्रात अढळ स्थान निर्माण केले आहे. दिग्गज संगीतकार आर.डी. बर्मन, ओपी नैय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासह अनेक संगितकारांसोबत त्यांनी शेकडो अजरामर गाणी गायली. एक हजारांपेक्षा जास्त चित्रपटांसाठी, 20 वेगवेगळ्या भाषांमध्ये आशाताईंनी गाणी गायली आहेत. आशाताईंनी सर्व प्रकारच्या गाण्यांना आवाज दिला. सर्वाधिक गाणी गाणारी गायिका म्हणून त्यांची गिनिज बुक मध्ये नोंद आहे. फिल्मफेअर, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके, महाराष्ट्र भूषणसह अनेक मानाच्या पुरस्काराने आशाताईंना सन्मानित करण्यात आले आहे. आज आशाताई आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी त्यांचा चिरतरुण आवाज आणि त्यांनी गायलेली अजरामर गाणी यांच्या रुपाने त्या कायम आपल्या स्मरणात राहतील.

आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांना व चाहत्यांना हा मोठा धक्का सहन करण्याची शक्ती मिळो अशी मी प्रार्थना करतो, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Comments are closed.