IPL 2026: केकेआरमध्ये हर्षित राणाची जागा कोण घेणार? रिप्लेसमेंटबाबत प्रशिक्षक अभिषेक नायर यांचा मोठा खुलासा

कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज हर्षित राणा (Harshit Rana) गुडघ्याच्या दुखापतीमुळे आयपीएल 2026 मधून बाहेर पडला आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या सराव सामन्यादरम्यान त्याला ही दुखापत झाली होती. हर्षितवर शस्त्रक्रिया झाली असून तो सध्या विश्रांती घेत आहे.

दरम्यान, केकेआर व्यवस्थापनाची चिंता वाढली असून अद्याप त्याच्या जागी पर्यायी खेळाडू (Replacement) मिळालेला नाही.

हंगामापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर (Abhishek Nayar on Harshit Rana’s Replacement) यांनी सांगितले की, हर्षितचे संघात नसणे हा आमच्यासाठी मोठा फटका आहे. गेल्या दोन हंगामात त्याने जबरदस्त कामगिरी केली होती आणि गेल्या वर्षभरात तो एक प्रगल्भ खेळाडू म्हणून घडला होता. त्याची जागा भरणे सोपे नाही. पर्यायी खेळाडूबाबत नायर म्हणाले की, गेल्या काही दिवसांत त्यांनी अनेक गोलंदाजांची चाचणी घेतली असून, पुढच्या काही दिवसांत कोणाचे नाव निश्चित करायचे, याचा अंतिम निर्णय घेतला जाईल.

केकेआरच्या अडचणी इथेच संपत नसून मथीषा पाथिरानाला खेळण्यासाठी अद्याप फिटनेस क्लिअरन्स मिळालेला नाही. तसेच टी-20 वर्ल्ड कपमध्ये वरुणची (Varun Chakrawarthy) इकॉनॉमी चांगली नव्हती, तरीही कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत तीन वेळा (2012, 2014 आणि 2024) विजेतेपद पटकावले आहे. 2024 मध्ये श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वाखाली संघ चॅम्पियन बनला होता. मात्र, 2025 चा हंगाम केकेआरसाठी खूपच निराशाजनक ठरला होता, जिथे त्यांना गुणतालिकेत आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

Comments are closed.