हर्षवर्धन सदगीर ‘डबल महाराष्ट्र केसरी’ ठरताचं जाहीर केली निवृत्ती; म्हणाला, “सरकारमुळे मॅट प्रकारामधून…”

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी करत पुन्हा एकदा किताब पटकावणाऱ्या हर्षवर्धन सदगीर याने धक्कादायक निर्णय घेतला आहे. पुणे शहरातील वाघोली येथे आयोजित ६८व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धनने ४-३ गुणांच्या जोरावर प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावला. अंतिम फेरीत त्याने महेंद्र गायकवाडचा पराभव करत ‘दुहेरी महाराष्ट्र केसरी’ होण्याचा बहुमान मिळवला.

हर्षवर्धनने थेट कुस्तीतून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. यावेळी त्याने त्याच्या या निवृत्तीमागचे कारणही स्पष्ट केले आहे. तो म्हणाला, “यापुढे मी मॅटवरील कुस्ती खेळणार नाही. त्याला सरकार जबाबदार आहे. कारण यासाठी मी खूप मेहनत घेतली. मी २०१९-२०२० मध्येही महाराष्ट्र केसरी झालो होतो. तेव्हा मला सरकारी नोकरीची आवश्यकता होता, मला मला ती सरकारने दिली नाही.”

“मी गरीब घरचा महाराष्ट्र केसरी होतो. दीड वर्ष नोकरीसाठी सर्वत्र फिरलो, मात्र सरकारने मला ती दिली नाही. त्यामुळेच मी निवृत्ती घेत आहे,” असेही हर्षवर्धनने पुढे म्हटले आहे. त्याने कुस्ती संपताच काही क्षणातच निवृत्तीचा निर्णय घेतला.

स्पर्धेत मॅट (गादी) प्रकारच्या गटातून अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या हर्षवर्धन सदगीरने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. दुसरीकडे, ‘माती’ गटातून आलेल्या महेंद्र गायकवाडनेही कडवी झुंज दिली. मात्र, निर्णायक क्षणी सदगीरने आपल्या अनुभवाचा आणि तांत्रिक कौशल्याचा वापर करत लढतीचे पारडे आपल्या बाजूने झुकवले.

२०२२पासून, ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे आयोजन दोन वेगवेगळ्या कुस्ती संघटनांद्वारे केले जात आहे. आतापर्यंत पार पडलेल्या ६८ स्पर्धांमध्ये, नरसिंग यादव आणि विजय चौधरी या दोघांनीही प्रत्येकी तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावला आहे.

Comments are closed.