मोदी हे गझनी आहेत, मनकर्णिका घाट, प्राचीन मंदिरं पाडली; हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर निशाणा

काशीतील प्राचीन मंदिरं आणि मनकर्णिका घाटाच्या पाडकामावरून मोदी सरकारवर टीका होत आहे. भाजपला देशातील प्राचीन मंदिरं तोडायची असून त्यांना देशाची इतिहास, ओळख पुसायची असून स्वतःचाच इतिहास रचायचा असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आता या मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला काशीतील मणिकर्णिका घाट बुलडोझर चालवून जमीनदोस्त करण्यात आला आहे. हे पाडकाम करताना अहिल्याबाईंचा पुतळा तोडला गेल्याचा आरोप झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. हे जे काम करण्यात येत आहेत, त्यावरून मोदी हे गझनी आहेत, असे म्हणत सपकाळ यांनी मोदींवर आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.

मोदी हे गझनी आहेत, मनिकर्णिका घाट पाडत आहे, त्यांचा निषेध करतो. देवतांच्या मूर्ती पाडल्या गेल्यात. गझनीने जशी घाटावरील मंदिरे पाडली, तशीच मोदी पाडत आहेत, अशी टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. वेळ पडली तर आम्ही देखील काशी येथे जाऊन आत्मक्लेश आंदोलन पुकारू, असा इशारा देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. भाजपला विलासरावांचेच नाही तर अहिल्याबाई होळकर यांचेही नाव पुसायचे आहे. त्यांना दुरुस्ती करत घाट बांधता आला असता. घाट उद्ध्वस्त करण्याच्या कामावरून त्यांचे बेगडीपण समोर आले आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Comments are closed.