अस्मानी संकटात सुलतानी सरकार झोपले, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

ऐन मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना राज्यातील सुलतानी महायुती सरकार मात्र झोपले आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून शेतकऱयांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

हर्षवर्धन सपकाळ यांनी टिळक भवन या काँग्रेस मुख्यालयात आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, एक रुपयात पीक विमा योजनेतून शेतकऱयांना काही प्रमाणात नुकसानभरपाई मिळत होती; पण ती योजनाही महायुती सरकारने बंद करून शेतकऱयांवर अन्याय केला. ती योजना पुन्हा लागू करावी अशी काँग्रेसची मागणी असल्याचेही सपकाळ म्हणाले.

खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. बी-बियाणे, खते यांचा मुबलक साठा उपलब्ध करून देणे सरकारची जबाबदारी आहे; पण सरकारच्या कृषी विभागाची काहीच तयारी दिसत नाही. बोगस बियाणे विकून व्यापारी शेतकऱयांची फसवणूक करत आहेत. खते, बियाणे लिंकिंग करून शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. सरकार फक्त कारवाईच्या घोषणा करते, पण कारवाई काही करत नाही. आता तरी सरकारने जागे व्हावे व लिंकिंग करणाऱयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.

राजीव गांधींच्या बलिदान दिनी राज्यव्यापी तिरंगा यात्रा

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये हिंदुस्थानी जवानांनी दाखवलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी येत्या 21 मे रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बलिदान दिनी काँग्रेसच्या वतीने राज्यव्यापी तिरंगा यात्रा काढण्यात येणार असल्याची माहितीही सपकाळ यांनी यावेळी दिली.

Comments are closed.