बाबर किंग की पनौती? पुन्हा केली चाहत्यांची निराशा, पाकिस्तानचं नुकसान!
2 ते 3 वर्षांपूर्वी पाकिस्तान संघाची ओळखच स्टार फलंदाज बाबर आझम (Babar Azam) होता. त्या काळात बाबर बॅटने शानदार खेळ करत होता. त्यामुळे त्याची तुलना ‘किंग’ विराट कोहलीशी (Virat Kohli) केली जात होती. पण गेली 2-3 वर्षे बाबर पाकिस्तानच्या किंगवरून ‘पनौती’ ठरत चालला आहे. गेली 2 वर्षे त्याची बॅट शांतच आहे. बाबर आझमने मागील 71 डावांपासून शतक झळकावलेले नाही. आता वेस्ट इंडिजविरुद्धही त्याने संघाची मान घालवली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात बाबर आझम शून्यावर बाद झाला. या सामन्यात डकवर्थ-लुईस नियमानुसार पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. बाबर आझमने वनडे फॉर्मॅटमध्ये शेवटचं शतक आशिया कप 2023 (Asia Cup) मध्ये नेपाळविरुद्ध ठोकलं होतं. त्यावेळी त्याने 151 धावांची खेळी केली होती. त्यानंतर बाबरने वनडे विश्वचषक 2023 आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions trophy) 2025 मध्येही विशेष कामगिरी केली नाही. वेस्ट इंडिजपूर्वी न्यूझीलंडविरुद्धही त्याची बॅट शांत राहिली. त्यामुळे त्याची फलंदाजी सरासरीही सतत घसरत चालली आहे.
वनडे फॉर्मॅटमध्ये सतत अपयशी ठरत असलेला बाबर आझम (Babar Azam) गेल्या 6 महिन्यांपासून टी20 संघात नाही. टेस्ट क्रिकेटमध्येही त्याची म्हणावी तशी कामगिरी नाही. बाबर सातत्याने फेल होत असल्यामुळे त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याने लवकरात लवकर शतकांचा दुष्काळ संपवायला हवा. नाहीतर टी20 नंतर वनडेमधूनही त्याला बाहेर बसावं लागू शकतं. मात्र टेस्ट क्रिकेटमध्ये पाकिस्तान टीम मॅनेजमेंट त्याला अजून थोडा वेळ साथ देऊ शकते.
Comments are closed.