IND vs AUS: ऑस्ट्रेलियात कोहलीचा दबदबा संपला? धक्कादायक आकडे समोर
सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेद्वारे विराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat Kohli & Rohit Sharma) यांनी बर्याच महिन्यांनंतर वनडे संघात पुनरागमन केलं आहे. आतापर्यंत दोन सामने झाले असून, दोन्ही सामन्यांत कोहली शून्यावर बाद झाला आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत अजूनपर्यंत विराटचं खातेही उघडलं नाही. दरम्यान, आता कोहलीविषयी काही धक्कादायक आकडे समोर आले आहेत, ज्यावरून स्पष्ट दिसतंय की ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचा दबदबा आता संपला आहे.
कधीकाळी विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जबरदस्त खेळींसाठी ओळखला जात होता. मात्र, मार्च 2023 नंतरपासून त्याची सर्व फॉरमॅट्स मिळून सरासरी फक्त 23.92 इतकी राहिली आहे. गेल्या एका वर्षात ही सरासरी आणखी घसरून 19 वर आली आहे. 2023 मध्ये कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 वनडे सामने खेळले आणि त्यात त्याची सरासरी 29.66 होती. मागील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील 9 डावांमध्ये त्याने फक्त 23.75 च्या सरासरीने धावा केल्या.
असं दिसतंय की “विराट युग” आता संपत चाललं आहे. जानेवारी 2024 नंतर सर्व संघांविरुद्ध त्याचं कसोटी, टी20 आणि वनडे फॉरमॅटमधलं प्रदर्शन अपेक्षेप्रमाणे राहिलेलं नाही. 2024 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत कोहलीची एकूण सरासरी 23.82 इतकी आहे. कसोटीमध्ये त्याची सरासरी 23.15, वनडेमध्ये 30.27, तर टी20 मध्ये फक्त 18 इतकी आहे. म्हणजेच गेल्या काही महिन्यांचा काळ त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विसरून जाण्यासारखा ठरला आहे.
BCCIच्या एका रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली आणि रोहित शर्माचा संघातला समावेश त्यांच्या कामगिरीवर अवलंबून असेल. अॅडलेड वनडेत रोहित शर्माने 73 धावांची शानदार खेळी केली, पण कोहली मात्र पर्थ आणि अॅडलेड दोन्ही सामन्यांत शून्यावर बाद झाला. आता पुढचा वनडे सामना सिडनीत खेळला जाणार असून, या सामन्यात विराटवर चांगली कामगिरी करण्याचं प्रचंड दडपण असेल. मालिकेचा शेवट होण्यापूर्वी आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी आणि पुन्हा एकदा आपली छाप उमटवण्यासाठी तो नक्की प्रयत्न करेल.
Comments are closed.