Hassan Mushrif gave a new option to CM Devendra Fadnavis for Shaktipeeth Highway


Shaktipeeth Highway : प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला राज्यातील शेतकऱ्यांकडून वारंवार विरोध करण्यात आला आहे. यासाठी सांगली आणि कोल्हापुरातील अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन देखील केले होते. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाला होणारा विरोध लक्षात घेऊन महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या महामार्गाला स्थगिती दिली होती. मात्र आता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 13 जानेवारी रोजी शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे आता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शक्तिपीठ महामार्गासाठी नवीन पर्याय सांगितल्याची माहिती दिली आहे. (Hassan Mushrif gave a new option to CM Devendra Fadnavis for Shaktipeeth Highway)

शक्तिपीठ महामार्गाला सांगलीतील नागरिकांनी विरोध केला आहे. पण सांगलीमध्ये शक्तिपीठ महामार्गाला कुणाचाही विरोध नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्याचा दाखला देत हसन मुश्रीफ यांनी म्हटले की, सांगलीपर्यंत येणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला आपण विरोध करण्याचं काहीच कारण नाही, पण कोल्हापूर जिल्ह्यात हा शक्तीपीठ महामार्ग येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – कंटेनरची 15 वाहनांना धडक, चालकाला पकडण्यासाठी पोलिसांकडून वीस किलोमीटरपर्यंत पाठलाग

हसन मुश्रीप म्हणाले की, कोकणातील बांधा ते वर्धा असा एकूण 865 किलोमीटरचा आणि 86 हजार कोटी रुपयांचा शक्तिपीठ महामार्ग होणार आहे. या महामार्गासाठी 12 जिल्ह्यातील 27 हजार 571 एकर जमीन हस्तांतरित करण्यात येईल. या महामार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमीनी मोठ्या प्रमाणात जाणार आहेत. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केला आहे. याचपार्श्वभूमीवर आता शक्तिपीठ महामार्ग सांगलीपर्यंत येईल आणि त्यानंतर तो संकेश्वरमार्गे गोव्याला जाईल, असा प्रस्ताव देवेंद्र फडणवीस यांना दिला असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा महामार्गाला विरोध का?

दरम्यान, हा महामार्ग राज्यातील तीन शक्तीपीठांना जोडणार असल्याने त्याला शक्तीपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. मात्र या महामार्गाच्या कामामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 59 गावे बाधित होणार आहेत. यामध्ये सर्वाधिक भूदरगड तालुक्यातील 21 गावांचा समावेश आहे. यानंतर कागल तालुक्यातील 13, करवीर तालुक्यातील 10 आणि शिरोळ, आजरा, हातकणंगले तालुक्यामधील पाच गावांचा समावेश आहे. त्यामुळे येथील शेतकरी या महामार्गाला विरोध करताना दिसत आहेत.

हेही वाचा – Nana Patole : सैफ अली खानवरचा हल्ला म्हणजे कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा, नाना पटोलेंची टीका



Source link

Comments are closed.