शेअर बाजारात कहर परतला
सेन्सेक्सची 1 हजार 836 ने घसरण, रुपयाही मंद
► वृत्तसंस्था / मुंबई
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा शेवट दृष्टीपथात येत नसल्याने भारतासह जगाच्या शेअरबाजारांची सोमवारी पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सोमवारी 1 हजार 836 अंकांनी घसरला आहे. भारताचे चलन असलेल्या रुपयाचीही घसरण झालेली असून त्याची किंमत सोमवारी प्रतीडॉलर 93.97 रुपये इतकी होती. युद्धाच्या परिणामामुळेच शेअरबाजार आणि रुपया या दोघांचीही घसरण होत आहे, असे स्पष्ट केले गेले.
भारताप्रमाणेच आशिया खंडातील सर्व शेअरबाजार आणि युरोप तसेच अमेरिकेतील सर्व शेअरबाजारांची घसरण दिसून येत आहे. यामुळे जगात मंदीचा धोका संभवत असून युद्ध लवकर थांबले नाही आणि परिस्थिती वेगाने पूर्वपदावर आली नाही, तर जगाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार, अशी स्थिती आहे. या युद्धाचा परिणाम दीर्घकाळ टिकून राहण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
भारताची स्थिती सध्या स्थिर
या युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटामुळे जगाची अर्थव्यवस्था अस्थिर आणि विस्कळीत होण्याची शक्यता असतानाच भारताची स्थिती अद्याप पर्यंत तरी स्थिर असल्याचे दिसून येत आहे. काही तज्ञांच्या मते या संकट भविष्यात भारताच्या संधींमध्ये भरही घालू शकते. भारताने आपला तेलपुरवठा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक देशांकडून तेल खरेदी करण्यास प्रारंभ केला असून सध्याच्या स्थितीत भारतात तेलाची तीव्र टंचाई नाही. मात्र, युद्ध लांबल्यास भारतालाही फटका बसू शकतो. भारताची तेलाची आवश्यकता जगात तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आहे. त्यामुळे भारताला अधिक दक्षता बळगावी लागणार असून तेल पुरवठा आणि इंधन वायू पुरवठा राखण्यासाठी पर्यायी स्रोत आणि पर्यायी मार्ग यांचा शोध हे युद्ध संपल्यानंतरही घ्यावा लागणार आहे, असे तज्ञांचे मत आहे.
शेअरबाजार सावरण्याचीही शक्यता
सध्या जागतिक परिस्थितीमुळे शेअरबाजाराची घसरण होत असली, तरी परिस्थिती काहीशी शांत झाल्यानंतर तो पुन्हा सावरु शकतो, असेही काही तज्ञांचे प्रतिपादन आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी संयम राखावा आणि घाईगडबडीत शेअर व्यवहार करू नयेत. सध्याच्या परिस्थितीत ‘थांब आणि वाट पहा’ हेच धोरण सर्वोत्तम आहे. ‘पॅनिक सेलिंग’ गुंतवणूकदारांनी टाळावे, अशी सूचना केली जात आहे. कदाचित लवकर परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी शक्यताही दाट आहे.
Comments are closed.