तो खरा धर्म म्हणजे अत्याचार करणार्‍यांचा नाश करणे!

सरसंघचालक मोहन भागवत यांची महत्वाची सूचना

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

हिंदू धर्म अहिंसेचा संदेश देत असला, तरी अत्याचारी लोकांना संपविणे हा धर्मच आहे, अशा शब्दांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे. बुधवारी जम्मू-काश्मीरमधील पेहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यासंबंधी ते प्रतिक्रिया व्यक्त करीत होते. एका पुस्तकाच्या अनावरण कार्यक्रमात ते येथे भाषण करीत होते.

भारताने कधीही आपल्या शेजारी देशांची हानी केलेली नाही. मात्र, कोणताही देश भारताविरोधात शत्रुत्वाच्या भावनेने वागतो आणि भारतावर अत्याचार करतो, त्यावेळी अशा देशाला धडा शिकविणे हे भारताचे कर्तव्य आहे आणि तो भारताचा अधिकारही आहे. राजाने आपल्या प्रजेचे संरक्षण केले पाहिजे, असा नियम आहे. सांप्रतच्या काळात राजाच्या भूमिकेत केंद्र सरकार आहे. प्रभू रामचंद्रांनी जेव्हा रावणाचा वध केला, तेव्हा ती हिंसा नव्हती, तर ते अत्यावश्यक कर्तव्य होते. पेहलगाम हल्ल्याच्या संदर्भातही हाच नियम लागू पडतो, असे त्यांनी अप्रत्यक्षरित्या सुचविले. आपल्या पूर्ण भाषणात त्यांनी पेहलगाम हल्ल्याचा प्रत्यक्ष उल्लेख केला नाही. कारण हा कार्यक्रम भिन्न होता. तथापि, त्यांनी अप्रत्यक्ष शब्दांमध्ये त्यांच्या भावना व्यक्त करुन या हल्ल्याचा प्रतिशोध घ्यावा, अशी सूचना केली आहे.

Comments are closed.