Vijay hazare trophy: कोहली-रोहितच्या पुढच्या मॅचचे लाईव्ह टेलिकास्ट होणार? मोठी अपडेट समोर

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा विजय हजारे ट्रॉफीमधील प्रदीर्घ काळानंतरचा पुनरागमन सोहळा संस्मरणीय ठरला. ‘किंग’ कोहलीने 131 धावांची दमदार खेळी केली, तर रोहित शर्माने तुफानी फलंदाजी करत 155 धावा कुटल्या.

मात्र, चाहत्यांना कोहली-रोहितच्या फलंदाजीचे थेट प्रक्षेपण (Live Telecast) पाहता आले नाही, ज्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांचा संताप अनावर झाला. चाहत्यांनी बीसीसीआयलाही (BCCI) धारेवर धरले. दरम्यान, काही रिपोर्ट्सनुसार बोर्ड विराट-रोहितच्या पुढच्या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट करण्याबाबत विचार करू शकते, असे म्हटले जात होते. आता या संदर्भात मोठे अपडेट समोर आले आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्माची विजय हजारे ट्रॉफीमधील फटकेबाजी टीव्हीवर पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या या दोन्ही दिग्गज फलंदाजांचे पुढचे सामने देखील चाहत्यांना टीव्हीवर लाईव्ह पाहता येणार नाहीत. तसेच, लाईव्ह स्ट्रीमिंगची देखील कोणतीही व्यवस्था होऊ शकलेली नाही. ‘स्टार स्पोर्ट्स’ने ट्विट करून माहिती दिली आहे की, (26 डिसेंबर) रोजी फक्त झारखंड विरुद्ध राजस्थान आणि आसाम विरुद्ध जम्मू-काश्मीर या सामन्यांचेच थेट प्रक्षेपण केले जाईल.

याचा अर्थ असा की चाहत्यांना पुन्हा एकदा निराश व्हावे लागणार आहे. कोहली दिल्लीकडून खेळत असून त्याच्या संघाचा पुढचा सामना (26 डिसेंबरला) गुजरातविरुद्ध आहे. तर मुंबईचा संघ त्याच दिवशी उत्तराखंडशी भिडणार आहे. मात्र, रोहित शर्माच्या स्फोटक फलंदाजीचा आनंद चाहत्यांना सवाई मानसिंग स्टेडियमवर जाऊन घेता येईल.

15 वर्षांनंतर विजय हजारे टूर्नामेंटमध्ये उतरलेल्या विराट कोहलीची बॅट आंध्र प्रदेशविरुद्धच्या सामन्यात जोरदार तळपली. किंग कोहलीने 101 चेंडूत 131 धावांची स्फोटक खेळी केली. या खेळीत विराटने 14 चौकार आणि 3 षटकार लगावले. दुसरीकडे, ‘हिटमॅन’ने एकट्याच्या जोरावर मुंबईला 8 गडी राखून विजय मिळवून दिला. रोहितने 94 चेंडूत 155 धावांची वेगवान खेळी केली. रोहितच्या बॅटमधून 18 चौकार आणि 9 षटकार निघाले होते.

Comments are closed.