रानमेवा – काळी काळी मैना… डोंगरची मैना
>> डॉ. सुनिलकुमार सरनाइक (karveerkashi@yahoo.co.in)
आयुर्वेदामध्ये करवंदं ही मौल्यवान मानली जाणारी वनौषधी असून त्याला ‘खट्टामीठा’ या नावानेही ओळखले जाते. असंख्य काटय़ांमध्ये लपून बसलेल्या करवंदांमध्ये अनेक शारीरिक व्याधी बरी करणारी गुणवैशिष्टय़ं आहेत. यात व्हिटामिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, लोह, खनिजे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर्स आणि एन्थोसायनिन म्हणजेच तंतुमय घटक पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. आरोग्यदायी वनौषधी म्हणून महत्त्व असलेला हा रानमेवा जतन करणे तसेच त्यापासून वनौषधी प्रक्रिया करणे आवश्यक आहे. याकरिता उद्योग उभारण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवेत. ग्रामीण व डोंगर भागात राहणाऱया शेतकरी व ग्रामीण जनतेला हक्काचा रोजगार मिळवून देणाऱया या रानमेव्याबाबत जनजागृती करणे व त्याअनुषंगाने लघुउद्योग उभारण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
‘काळी काळी मैना, डोंगरची मैना,
खयला पन्ना, गोडिला हन्ना… '
अशा आरोळ्या देत आमच्या लहानपणी म्हणजे अगदी 70-80 च्या दशकात उन्हाळा सुरू झाला की, दारोदारी डोंगरची काळी मैना विकायला यायची. डोंगरची काळी काळी मैना म्हणजेच आपली करवंदे! एका टोपलीमध्ये असंख्य लाल-काळी अशी लहान लहान टपोरी करवंदं छान ऐटीत बसलेली असायची. पळसाच्या पानांचा एक लहानसा द्रोण करून ही करवंदं दिली जायची. त्या काळी आवडीने खाल्ली जाणारी करवंदं आता मात्र फार दुर्मिळ झाली आहेत. बाजारात फार कमी वेळा करवंदे पाहायला मिळतात. चवीने आंबटगोड असणारी हिरवी व पिकलेली काळी करवंदं आरोग्यासाठीही तितकीच फायदेशीर आहेत.
रखरखत्या उन्हात अर्थात उन्हाळ्यात रानावनात येणाऱया रानमेव्याची लज्जत वेगळीच असते. फळांचा राजा आंबा, काजू, फणस या कोकणी फळांचा हा मोसम असला तरी रानावनात, दऱयाखोऱयांत पिकणाऱया कैरी, हिरडा, आवळा, जांभूळ, करवंदे, नेरले, तुतू यांसारख्या नैसर्गिक रानमेव्याची गोडी काही औरच असते.
यंदाच्या उन्हाळ्यात ‘काळी मैना डोंगरची मैना’ म्हणजेच करवंदे बाजारात दिसू लागली आहेत. रखरखत्या उन्हात करवंदांचा आस्वाद घेण्यासाठी आबालवृद्ध नेहमीच हौसेने आघाडीवर असतात. शाहूवाडी तालुक्यातील विशाळगड, आंबा, गगनबावडा, करूळ, राधानगरी, फोंडा यांसह सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जाळीदार हिरव्यागर्द झाडीत हा रानमेवा हमखास पाहायला मिळतो. कोकणात व सह्याद्रीच्या डोंगरकपारीत करवंदाच्या जाळ्या मोठय़ा प्रमाणात आढळून येतात. यंदाच्या मोसमात करवंदाच्या जाळ्या बहरल्या आहेत. हिरव्या, कच्च्या व पिकलेल्या काळय़ा करवंदांनी यंदाचा मोसम बहरला आहे. काटय़ाकुटय़ांची पर्वा न करता करवंदाच्या जाळ्यांत शिरून टोपली टोपली भरून करवंदे काढण्यात डोंगरदऱयात राहणाऱया, वाडय़ावस्त्यांतील आदिवासी शेतकरी, महिला व मुले व्यग्र असताना दिसत आहेत. करवंदाची जाळी संपूर्ण काटेरी असते. या काटय़ांतून करवंदे तोडणे मोठे जिकिरीचे व कष्टाचे काम असते. पिकलेली करवंदे एक-एक करून काढून टोपलीत ठेवणे हे काम तसे तापदायक असते. सकाळी सकाळी डोंगरदऱयांत जाऊन हे काम करावे लागते. शिवाय ही तोडलेली करवंदे बाजारात, एसटी स्टँडवर जाऊन फिरून विकावी लागतात. पिंपळाच्या किंवा वडाच्या पानांचे द्रोण तयार करून दहा- वीस रुपये याप्रमाणे ती विकली जातात. काळ्या व गोड करवंदांना बाजारात जादा मागणी आहे. सालाबादप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात ‘डोंगरची मैना काळी मैना’ अर्थात करवंदे विकत घेण्यासाठी व तिची आंबटगोड चव चाखण्यासाठी आबालवृद्ध मोठय़ा प्रमाणात पसंती देत आहेत. एखाद्या तुरट किंवा आंबट तसेच एखाद्या अगदीच गोड अशा संमिश्र चवीची करवंदे खायला सर्वांनाच आवडते. त्यामुळे पावसाच्या आधी बाजारात दाखल होणारी करवंदे घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडते आहे. यंदा बाजारात करवंदाची आवक कमी असल्याने एका किलोसाठी शंभर रुपये ते दीडशे रुपये दर आकारला जात आहे. एक टोपली 550 ते 600 रुपयांपर्यंत विकली जात आहे.
अति उष्णता, पर्जन्यमान कमी तसेच वणवे लागत असल्याने करवंदाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे, असे मत इथल्या धनगर बांधवांनी व्यक्त केले. मे महिन्यात सुट्टी असल्याने वाडय़ावस्त्यांतील शालेय विद्यार्थीसुद्धा वह्या, पुस्तके व शैक्षणिक इतर खर्चासाठी करवंदे विक्री करून अर्थार्जन करताना दिसतात. डोंगरकपारीत मिळणारी ही काळी मैना म्हणजे रानावनात राहणाऱया शेतकरी व धनगर यांसारख्या समाजासाठी आपल्या कुटुंबाला रोजीरोटी देणारी देवता आहे, असे कृतज्ञतापूर्वक मत व्यक्त करतात.
आयुर्वेदामध्ये मौल्यवान मानला जाणारा हा रानमेवा वनौषधी म्हणून खूपच महत्त्वाचा व आवश्यक आहे. ‘खट्टा मीठा’ या नावानेदेखील ओळखला जाणारा हा रानमेवा सह्याद्रीच्या डोंगरकडय़ांवर मिळतो. असंख्य काटय़ांमध्ये लपून बसलेल्या करवंदामुळे अनेक शारीरिक व्याधी बऱया होतात. करवंदाचे फळ विविध गुणकारी गुणांनी समृद्ध आहे. यात व्हिटामिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, लोह, खनिज, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फ़ायबर्स आणि एन्थोसायनिन म्हणजेच तंतुमय घटक पदार्थ भरपूर असतात. यासोबतच यातली प्रथिने आणि आम्ल शरीराला ऊर्जा नि तरतरी मिळवून देते. आधुनिक आरोग्यशास्त्र प्रगत झाल्यामुळे आपण हल्ली अँटिबायोटिकवर फार अवलंबून राहतो, पण आदिवासी समाजात आजही शरीरातील साखरेचे प्रमाण स्थिर ठेवण्यासाठी करवंदाचाच वापर केला जातो. पारंपरिकपणे वनस्पती उपचारांतदेखील करवंद वापरले गेले आहे. ज्यात खरूज, आतडय़ांतील जंत, अतिसार, अधूनमधून येणारा ताप आणि कामोत्तेजक, अँटिपायरेटिक, अॅपेटायझर, अँटिस्कॉर्ब्युटिक, अँथेलमिंटिक आणि सोबत करवंद (ConkeRerry) त्याच्या तुरट गुणधर्मांसाठीदेखील विशेष प्रसिद्ध आहे. मात्र जंगलात किंवा डोंगरदऱयात वणवा लागला की, ही अमूल्य संपत्ती नष्ट होते. त्यामुळे आरोग्यदायी वनौषधी म्हणून महत्त्व असलेला हा रानमेवा जतन करणे तसेच त्यापासून वनौषधी प्रक्रिया करणे आवश्यक आहे. याकरिता उद्योग उभारण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवेत. ग्रामीण व डोंगर भागात राहणाऱया शेतकरी व ग्रामीण जनतेला हक्काचा रोजगार मिळवून देणाऱया या रानमेव्याबाबत जनजागृती करणे व त्याअनुषंगाने लघुउद्योग उभारण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
(लेखक मानसशास्त्र व लोककलेचे अभ्यासक आहेत.)
कर्वांडा (भारतीय चेरी) चे आरोग्य फायदे – आयुर्वेदातील एक मौल्यवान औषधी औषधी वनस्पती
Comments are closed.