Health Tips : डायबिटीज असलेल्यांनी आंबा खावा का?

उन्हाळा आला आहे, त्यामुळे आंब्याच्या सीझनलाही सुरूवात झाली आहे. वर्षभरात नैसर्गिक आंबे एकदाच खायला मिळत असल्यामुळे त्याचा या काळात मनसोक्त आस्वाद घेतला जातो. जरी, सध्या अनेक दुकानांमध्ये वर्षभरासाठी सर्व काही मिळत असले, तरीसुद्धा आंबे खाण्याची खरी मजा तेव्हाच जाणवते जेव्हा त्याचा हंगाम उन्हाळ्यात असतो. आंब्याला त्याच्या अद्भुत पोषक तत्वांमुळे आरोग्यदायी मानले जात असले तरी, त्यात नैसर्गिक साखर असते, जी मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक मानली जाते. त्यामुळे मधुमेही रुग्ण उन्हाळ्यात आंबा खाऊ शकतात की नाही असा प्रश्न पडतो. याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात आजच्या या लेखातून.

आंबा रक्तातील साखरेची पातळी वाढवतो का?

भारतातील सर्वात आवडत्या उन्हाळी फळांपैकी एक फळ म्हणजे आंबा. हा आंबा फायबर आणि आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असतो. उन्हाळ्यात सकाळी आणि दुपारी तुम्हाला ताजेतवाने करण्यासाठी एक ग्लास आंब्याचा रस पिणे देखील पुरेसे ठरू शकते. परंतु कधीकधी, मधुमेहाचे रुग्ण हे गोड फळ त्यांच्या आहारात समाविष्ट करणे टाळतात कारण त्यांना वाटते की त्यात जास्त साखर असते ज्यामुळे त्यांची तब्येत बिघडू शकते आणि त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. हे फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी खरंच वाईट आहे की हा एक गैरसमज आहे ते पाहूयात.

नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट्सने समृद्ध

आरोग्य तज्ञांच्या मते, आंब्यामध्ये नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकतात. मात्र आंब्यांमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि विविध जीवनसत्त्वे देखील असतात जी एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

मधुमेहींनी उच्च जीआय इंडेक्स असलेल्या गोष्टी खाणे टाळावे

आंब्याचा विचार केला तर, या फळाचा जीआय स्तर 51 असतो. याचा अर्थ असा की जर तुम्ही एकाच वेळी भरपूर फळे खाल्ली तर आंबे तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ करू शकतात.

आरोग्य तज्ञांच्या म्हणण्यानुसार , आंबे रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात. परंतु ते किती प्रमाणात खाल्ले जातात, ते कशासह खाल्ले जातात आणि व्यक्तीच्या शरीरातील इन्सुलिनची पातळी काय यावर शुगर लेव्हल अवलंबून असते. आंब्यामध्ये असलेल्या नैसर्गिक साखरेमुळे, जास्त आंबा खाल्ल्याने रक्तातील साखरेची वाढ होऊ शकते.

मधुमेही एका दिवसात किती आंबे खाऊ शकतात?

आंब्यामध्ये नैसर्गिक साखर असते जी मधुमेहींसाठी धोकादायक ठरू शकते. आठवड्यातून एक किंवा दोन कापांपेक्षा जास्त आंब्याचे सेवन करू नका. परंतु जर तुम्ही अगदी कमी प्रमाणात आंबा खात असाल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हेही वाचा : Parenting Tips : ओव्हर पेरेंटिंग ठरू शकते धोकादायक


संपादित – तनवी गुडे

Comments are closed.