ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकांवर आज सुनावणी.
सर्वोच्च न्यायालयात होणार जोरदार युक्तिवाद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालय 5 ऑक्टोबर रोजी या याचिकांवर सुनावणी घेणार आहे. या याचिकांमध्ये ज्ञानेश कुमार यांनी ‘एसआयआर’ संदर्भात घेतलेल्या कथित एकतर्फी निर्णयांना आणि कार्यवाहीला आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची व न्यायमूर्ती व्ही. मोहना यांचा समावेश असलेल्या खंडपीठासमोर होईल.
न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक चौकशी किंवा एसआयटीची स्थापना, ईसीआयनेट आणि ईआरओनेटचे फॉरेन्सिक ऑडिट, तसेच मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. एका याचिकेत, प्रकरण प्रलंबित असेपर्यंत ज्ञानेश कुमार यांना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम करण्यापासून रोखण्याची मागणीही करण्यात आली आहे. निवडणूक आयोगामध्ये सामूहिक निर्णय घेण्याची प्रणाली लागू केली पाहिजे आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार संपूर्ण निवडणूक आयोगाला घटनात्मकदृष्ट्या प्रदान केलेले अधिकार वापरू शकतात का, असा प्रश्न याचिकेत उपस्थित केला आहे. सदर याचिकेत निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी केलेल्या लेखी टिप्पण्या आणि फाईलमधील नोंदींचा देखील संदर्भ दिला आहे.
Comments are closed.