Heat Storm Alert – आता उष्णतेची लाट नव्हे, तर येणार महाकाय ‘हीट स्टॉर्म्स’! हिंदुस्थानसमोर मोठे संकट?
हिंदुस्थानसह जगभरात वाढत्या तापमानाचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, आता केवळ उष्णतेची लाट नव्हे तर ‘उष्णतेचे वादळ’ येण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामानात होत असलेल्या अमुलाग्र बदलांमुळे आता उष्णतेचे एक महाकाय स्वरूप पृथ्वीवर निर्माण होत आहे. ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेच्या एका नवीन अहवालातून ही अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून, हे महाकाय उष्णतेचे वादळ महिनाभर किंवा त्याहून अधिक काळ टिकू शकते. ज्यामुळे हिंदुस्थानसारख्या देशांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
‘रॉयटर्स’च्या नव्या अभ्यासानुसार, 1960 पासूनचा ताशी जागतिक तापमानाचा डेटा तपासून आणि दोन डझनहून अधिक हवामान संशोधनांचा सल्ला घेऊन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. आता उष्णतेची समस्या काही मोजक्या ठिकाणांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. संपूर्ण पृथ्वीवर तापमानाचे दीर्घकाळ टिकणारे स्पेल तयार होत आहेत. सलग पाच किंवा त्याहून अधिक दिवस असामान्यपणे उच्च तापमान राहिल्यास त्याला उष्णतेची लाट म्हटले जाते. या तपासणीनुसार, 1960 च्या दशकात वर्षाला सरासरी 5 ‘हीट स्टॉर्म्स’ येत असतं. पण चालू दशकात हा आकडा प्रचंड वाढून दरवर्षी सुमारे 102 वर पोहोचला आहे. 2023 आणि 2024 मध्ये आलेली ‘हीट स्टॉर्म व्हेरा’ नावाची आतापर्यंतची सर्वात मोठी घटना तब्बल 367 दिवस टिकली आणि यादरम्यान तिने पृथ्वीच्या जवळपास 85 टक्के भागावर आपला प्रभाव टाकला. साहजिकच, यामुळे 2024 हे वर्ष आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले होते. कार्बन डायऑक्साइडसह हरितगृह वायूंच्या वाढीशी या वाढत्या उष्णतेचा थेट संबंध असल्याचे आढळले आहे. 1960 पासून कार्बन डायऑक्साइडची पातळी 30 टक्क्यांहून अधिक वाढली असून, याच कालावधीत उष्णतेच्या लाटा आणि ‘हीट स्टॉर्म्स’ने व्यापलेले पृथ्वीचे सरासरी क्षेत्र तब्बल 12 पटीहून अधिक वाढले आहे.
हिंदुस्थानसारख्या देशासाठी हा अहवाल अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे. आपल्याकडे सार्वजनिक आरोग्य, शेती आणि पाणीपुरवठ्याला आधीच तीव्र उष्णतेचा फटका बसत असताना, या नव्या अभ्यासाने धोक्याची घंटा वाजवली आहे. हवामान विभाग (IMD) स्थानिक तापमान मर्यादा आणि सामान्य तापमानातील फरकाच्या आधारावर उष्णतेची लाट जाहीर करतो. पण ‘हीट स्टॉर्म’ हा प्रकार पूर्णपणे वेगळा असून तो विशिष्ट मर्यादेत न बसता संपूर्ण जगातील उष्णतेच्या घटनेचा प्रचंड आवाका दर्शवतो.
Comments are closed.