Heatstroke victim in Nashik; Farmer from Shevge Darna dies


नाशिकरोड । नाशिक जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, कडक उन्हामुळे शेतकर्‍यांचे हाल सुरू आहेत. नाशिक तालुक्यातील शेवगे दारणा येथे उन्हाच्या झळांमध्ये पाइपलाइन दुरुस्त करताना एका शेतकर्‍याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि. २ मे) घडली.

प्राप्त माहितीनुसार, जगदीश रघूनाथ कासार (वय ४५) हे आपल्या शेतात पाणी पोहोचवणारी पाइपलाइन नादुरुस्त झाल्यामुळे ती दुरुस्त करण्यासाठी दुपारी तप्त उन्हात काम करत होते. दुपारी सुमारे तीन वाजता त्यांना चक्कर येऊन ते कोसळले. तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाने कासार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. नाशिक जिल्ह्यात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पार गेलं असून, उष्णतेची तीव्र झळ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करत आहे. सध्या शहरासह ग्रामीण भागातही अंगाची लाहीलाही करणारे तापते वारे आणि प्रखर सूर्यप्रकाशामुळे लोक त्रस्त झाले आहेत.

उष्माघात म्हणजे काय?
उष्माघात (Heatstroke) हा उष्णतेच्या अधिक संपर्कात आल्यानंतर शरीराचे तापमान नियंत्रण बिघडल्याने होणारा गंभीर विकार आहे. यामध्ये शरीराचे तापमान ४०अंश सेल्सिअसपेक्षा अधिक जाते आणि मेंदूवर व अवयवांवर विपरीत परिणाम होतो.

उष्माघाताची लक्षणे:
चक्कर येणे व अचानक बेशुद्ध होणे
घाम न येणे आणि त्वचा कोरडी पडणे
ताप खूप वाढणे
श्वासोच्छ्वास जलद होणे
मळमळ, उलटी, अशक्तपणा

उष्माघातापासून बचावासाठी उपाय:
दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात काम टाळा
भरपूर पाणी व द्रवपदार्थांचे सेवन करा
हलका व सैलसर कपडा वापरा
डोक्यावर टोपी, अंगावर ओढणी किंवा अंगरखा ठेवा
गरज असल्यास थंड सावलीत विश्रांती घ्या
अत्यावश्यक असल्यासच उन्हात काम करा



Source link

Comments are closed.