इराण युद्धात अमेरिकेचे २४ हजार कोटींचे नुकसान, CSIS च्या अहवालातून माहिती समोर
इराणसोबत सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. अमेरिकेतील सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज (CSIS) या थिंक टँकच्या अहवालानुसार, इराणचे क्षेपणास्त्र हल्ले, ड्रोन आणि एका फ्रेंडली फायरच्या घटनेमुळे अमेरिकेच्या लष्करी उपकरणांचे सुमारे २.३ अब्ज ते २.८ अब्ज डॉलर्स (हिंदुस्थानी चलनानुसार १९,४०० कोटी ते २३,७०० कोटी रुपये) इतके नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे हा अंदाज केवळ हवाई उपकरणांचा असून यामध्ये नौदलाच्या जहाजांचे किंवा तळांवरील इतर नुकसानीचा समावेश नाही. यासंदर्भात ‘आज तक’ ने वृत्त दिले आहे.
यातच अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी २६ मार्च रोजी कॅबिनेट बैठकीत दावा केला होता की, इतिहासात कोणत्याही देशाच्या सैन्याला इतक्या वेगाने आणि प्रभावीपणे कमकुवत केले गेले नाही. मात्र या दाव्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २७ मार्चला इराणने सौदी अरेबियातील अमेरिकेच्या प्रिंस सुल्तान एअरबेसवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने भीषण हल्ला केला.
या हल्ल्यात अमेरिकेचे अत्यंत महागडे E-3 AWACS रडार डिटेक्शन विमान नष्ट झाले. याची किंमत सुमारे ५,९२० कोटी रुपये आहे. हे विमान आकाशातील एक कमांड सेंटर म्हणून ओळखले जाते. जे शेकडो किलोमीटर दूरवरून शत्रूची विमाने आणि क्षेपणास्त्रांचा शोध घेते.
CSIS चे वरिष्ठ सल्लागार मार्क कॅनशियन यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेचे खालीलप्रमाणे नुकसान झाले आहे:
- THAAD मिसाइल डिफेन्स सिस्टम – या प्रणालीचे एक किंवा दोन शक्तिशाली रडार नष्ट झाले आहेत, ज्यांची किंमत ४,१०० कोटी ते ८,२०० कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.
- हवाई नुकसान – इराणचे हल्ले आणि एका फ्रेंडली फायर घटनेत एकूण १९,४०० कोटी ते २३,७०० कोटी रुपयांचे नुकसान झाले.
- F-15 फायटर जेट – कुवैतमध्ये झालेल्या फ्रेंडली फायर मध्ये अमेरिकेची तीन F-15 फायटर जेट्स देखील नष्ट झाली आहेत.
दरम्यान, या युद्धाची सुरुवात २८ फेब्रुवारी रोजी झाली. इराणने केवळ अमेरिकन तळांवरच नाही, तर अमेरिकन सैनिक असलेल्या खाडी देशांतील तळांवरही हल्ले केले. तसेच होर्मुझ सामुद्रधुनीमधील तेल वाहतूक प्रभावित केली. यातचआधुनिक युद्धात क्षेपणास्त्रे आणि ड्रोन किती प्रभावी ठरू शकतात, हे या नुकसानीवरून स्पष्ट झाले आहे.
Comments are closed.