Jamkhed News – सावरगावात घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू

जामखेड परिसरात यावर्षी अतिवृष्टीने भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे दोन दिवसांपूर्वी पिंपळगाव उंडा येथील पारूबाई गव्हाणे या वृध्द महिलेचा भिंत अंगावर कोसळून मृत्यू झाला होता. तर दि. 22 रोजी सावरगाव येथे घर कोसळून तीघे जखमी झाले होते. यातील गौतम बाबासाहेब गोरे (40) यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना नगर येथे खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. दहा दिवसांच्या उपचारानंतर अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे सावरगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

जामखेड परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला होता. अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. विशेषतः नदीकाठच्या लोकांना मोठा धोका निर्माण झाला होता. पिके पाण्यात गेलेली आहेत. त्यामुळे तालुक्यातील नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे. यातच सावरगाव येथे पावसामुळे एक घर पडले होते. तिघे जखमी झाले होते यातील एकाचा आज मृत्यू झाला आहे.

जामखेड तालुक्यातील सावरगाव येथे दि. 21 रोजी शनिवारी सायंकाळी गौतम बाबासाहेब गोरे हे रात्री आपल्या घरात कुटुंबासमवेत झोपलेले असताना रविवारी दि. 22 रोजी पहाटे साडेचार वाजता घर कोसळले. यात गौतम, त्यांच्या पत्नी व मुलगा तीघे जखमी झाले होते. यातील गौतम गोरे यांना जास्त मार लागला होता. एक डोळा व डोक्यावर बीम कोसळला होता ते गंभीर जखमी झाले होते. दहा दिवस ते नगर येथे उपचार घेत होते. मंगळवारी सकाळी दहा दिवसांच्या उपचारानंतर अखेर त्यांचा मृत्यू झाला. गोरे यांची परिस्थिती बेताची असून लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी अशी मागणी होत आहे.

Comments are closed.