मराठवाडा बुडाला! लातूर, धाराशीव, बीड, परभणी, हिंगोली, नांदेडवर आभाळच फाटले!!
आठ दिवसांत दुसऱ्यांदा मराठवाडा महापुरात बुडाला. शुक्रवारी मध्यरात्रीच बीड, लातूर, धाराशीवसह हिंगोली, परभणी, नांदेडवर आभाळच फाटले. एक क्षणभराची विश्रांती न घेता शनिवार सायंकाळपर्यंत कोसळणाऱ्या पावसाने मराठवाड्यातील उरली सुरली पिके, रस्ते, पूल… होते नव्हते ते सगळेच वाहून नेले. बीडमध्ये कोपलेल्या बिंदुसरेने बीडमधील अनेक वस्त्यांमध्ये थैमान घातले. गोदावरीच्या पुराचे पाणी नांदेडात घुसले. मांजरा, तेरणा, तिरु आदी नद्यांनी लातूरला मगरमिठी घातली. मुसळधार पावसाने धाराशीवची पार दैना उडवली. गोदावरीच्या पुराचे पाणी थेट नांदेड शहरात घुसले. हिंगोली जिल्हा जलमय झाला. मराठवाड्यातील जवळपास साडेतीन हजार रस्ते खचले. लातूर जिल्ह्यातील एकही रस्ता पावसाने वाहतुकीयोग्य ठेवला नाही. माजलगाव धरणातून सव्वा लाख क्युसेसचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे सिंदफणा नदीने ‘फणा’ उगारला असून पार गंगाखेडपर्यंत महापूर पसरला आहे.
गेल्या आठवड्यातच पावसाने मराठवाड्यात तांडव घातले. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यातील 32 लाख हेक्टरवरील उभे पीक पावसाने वाहून नेले. सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, उडदासह मोसंबी, ऊस… शिवारात काही म्हणून काहीच शिल्लक राहिले नाही. नदीकाठावरील संसार महापुरात बुडाले. शुक्रवार मध्यरात्रीपासून पावसाने पुन्हा संततधार लावली. बीड, लातूर, धाराशिव, हिंगोली, नांदेड, परभणीवर दुसऱ्यांदा आभाळ फाटले.
लातूर जिल्ह्यात 24 तासांत 37 महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. सर्वाधिक पावसाचा तडाखा शिरूर ताजबंद आणि हडोळती मंडळाला बसला असून येथे 165 मिमी पावसाची नोंद झाली. औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, देवणी, शिरूर अनंतपाळ, जळकोट तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. ठिकठिकाणी वाहतूक तुंबली. पावसाचा जोर वाढला तसा जिल्ह्यातील सर्व नदी, नाले उफाणावर आले. निलंग्यातील प्रसिद्ध राम मंदिराची भिंत पावसामुळे कोसळली. औराद शहाजनीला पुन्हा जबर पावसाचा तडाखा बसला.
बीड जिल्ह्याला दुसऱ्यांदा पावसाने महापुरात लोटले. जिल्ह्यात 18 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामुळे बिंदुसरा, कडा, कुंडलिका, मांजरा, वांजरा, सिंदफणा नद्यांना महापूर आला. नदीकाठावरची गावे पाण्याखाली गेली. अनेक पुलांवरून पाणी वाहू लागले. जिल्ह्यातील तब्बल आठशेपेक्षा जास्त रस्ते खचले.
नांदेड शहर आणि जिल्ह्यात पहाटे तीन वाजेपासून पावसाने हाहाकार उडवला. तब्बल पाच तास अखंड चालू असलेल्या पावसामुळे नांदेड जिल्हा तिसऱ्यांदा पुराच्या मगरमिठीत गेला. जिल्ह्यातील 25 मंडळात अक्षरशः ढगफुटीच झाली. लिंबोटी धरणाचे 15 दरवाजे उघडण्यात आल्याने पंधार तालुक्याला पहाटेच पुराचा वेढा पडला. तुफान पावसामुळे वसमत आणि मुखेड मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.
हिंगोली जिल्ह्याला सर्वाधिक पावसाचा तडाखा बसला. वसमत तालुक्याला पावसाने झोडपून काढले. सेनगावमध्ये रात्रभर पाऊस झाला. हयातनगर मंडळात सर्वात जास्त 128 मिमी पावसाची नोंद झाली. राजवाडीसह इतर गावांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. पावसामुळे कुरुंदा परिसरातील अनेक कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. संततधार पावसामुळे कयाधू नदी कोपली असून पुराचे पाणी आजूबाजूच्या शिवारात घुसले आहे. इसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पैनगंगेला महापूर आला असून मराठवाड्याचा विदर्भाशी असलेला संपर्क तुटला आहे.
परभणी जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस चालू आहे. माजलगाव धरणातून सिंदफणा नदीत विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे पार गंगामसल्यापर्यंत पुराचा धोका पुन्हा वाढला आहे. गंगाखेडमध्ये गोदावरी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून पालम तालुक्याला पुराचा वेढा पडला आहे. पूर्णा नदीही धोक्याच्या पातळीवर गेली असून काठावरील जमीन पुरात वाहून गेली आहे. जिल्ह्यात तब्बल 52 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात मात्र तुलनेने कमी पाऊस झाला.
Comments are closed.