धाराशीव जिह्यात पुन्हा अतिवृष्टी! कळंब, निलंगा तालुक्यांत हाहाकार; अनेक गावांचा संपर्क तुटला

मराठवाड्यात यंदा परतीचा पाऊस पुन्हा परतला असून, आज धाराशिव आणि लातूर जिह्यांत धो-धो पाऊस कोसळला. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील चार मंडळांत शनिवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार उडाला. अनेक नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून, एक जण पुरात वाहून गेला आहे. या अतिवृष्टीने शेतकऱ्यांनी काढलेल्या सोयाबीनचा चिखल झाला असून, बळीराजा पुन्हा मोठ्या संकटात सापडला आहे. लातुरातील निलंगा तालुक्यात पावसाने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले. धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे कळंब तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांना धीर देत आहेत.

मागील दोन दिवसांपासून उन्हाची तीव्रता काढू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईत सोयाबीनची काढणी सुरू केली होती. त्यातच शनिवारी मध्यरात्री पाऊस जोरदार बरसला आहे. त्याचा फटका धाराशिवमधील कळंब तालुक्याला बसला. तालुक्यातील बाभळगाव, देवळाली, भाटशिरपुरा, जवळा खु. एकुरका आदी गावांतील अनेक घरात पावसाचे पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्य निकामी झाले. घरात पाणी साचल्याने अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले आहे.

वाहतूक ठप्प

अंदोरा-बाभळगाव, देवधानोरा-एकुरका रोड, वाशिरा नदीकरील इटकूर-पारा रस्ता, इटकूर भोगजी रस्ता, मोहा-कळंब, कोठाळवाडी रस्ता आणि खामसवाडी-मोहा- कन्हेरवाडी मार्गावर रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. नागरिकांना आता लांबच्या पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. तर संजीतपूर गावाला पुराचे पाणी धडकले आहे. खामसवाडी शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत.

खासदार राजेनिंबाळकर यांची भेट

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी कळंब तालुक्यातील ढोराळा, पाडोळी, काठकडा, देवळाली, जवळा (खुर्द) क एकुरका येथे पाहणी केली. या गावांतीलपरिस्थिती पाहता राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

चार मंडळात अतिवृष्टी

कळंब 46 मिमी, इटकूर 72 मिमी, येरमाळा 48मिमी, मोहा 74.3, शिराढोण 77, गोविंदपूर 77 मि. मी पाऊस झाला आहे. सहा मंडळापैकी चार मंडळात अतिवृष्टी झाली आहे. एकुरका येथील जवळा-एकुरका नदीच्या पात्राकरील दोन्ही कोल्हापुरी बंधारे वाहून गेले आहेत. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

एक जण पुरात वाहून गेला

रविवारी सकाळी सहा वाजता पाडोळी येथील शेतकरी विजयकुमार सत्यनारायण जोशी (43) हे दूध आणण्यासाठी आणि जनावरांना चारा देण्यासाठी शेतात गेले होते. शेतातून घरी परतताना निपाणी-पाडोळी ओढ्यातील पाण्याची पातळी खूप वाढली होती. बंधाऱ्यावरून पाणी वेगात वाहत असल्यामुळे अंदाज चुकल्यामुळे ते वाहून गेले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

भरडलेल्या सोयाबीनच्या घुगऱ्या…

इटकूर येथील वाशिरा नदीला आलेल्या महापुराने अक्षरशः थैमान घातले. बापूराव गंभीरे यांनी भरडलेल्या सोयाबीनच्या अक्षरशः घुगऱ्या झाल्या. वाळत घातलेले भिजलेले सोयाबीन ओंजळीने भरताना मन हेलावून जात होते. इटकूर येथील विश्वनाथ आडसुळ यांचे काढलेल्या सोयाबीनची गंजी वाशिरा नदीच्या पुरात वाहून गेली. नदीकाठच्या सोयाबीनचा चिखल झाला. शेतांमध्ये तळे साचले.

Comments are closed.