हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचे नुकसान होते
वृत्तसंस्था / सिमला
हिमाचल प्रदेशात गेल्या एक आठवडाभर अतिवृष्टी होत आहे. अतिवृष्टी, भूस्खलन आणि पूर यांच्यामुळे 68 लोकांचा बळी गेला आहे. या राज्यात 20 जूनला मान्सूनच्या पावसाचे आगमन झाले. तेव्हापासून अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. अनेक खेडी मुख्य भूभागापासून तुटली आहेत.
या छोट्या राज्यात आतापर्यंत पावसाने शेकडो घरे वाहून गेली असून 198 गोशाळा उध्वस्त झाल्या आहेत. एकंदर वित्तहानीचे प्रमाण 495 कोटी रुपये असल्याची माहिती राज्याच्या सांख्यिकी विभागाने दिली. अनेक मार्गांवर दरडी कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून 20 जूनपासून आतापर्यंत पावसाशी संबंधित अपघातांमध्ये 25 जणांचा मृत्यू झाला आहे. मंडी जिल्ह्यात झालेली हानी सर्वाधिक असून 80 घरे पूर्णत: उध्वस्त झाली आहेत. या जिल्ह्यात मृतांची संख्या 20 वर पोहचली आहे.
कंगडा जिल्ह्यात 13 मृत्यू
मंडी जिल्ह्याच्या खालोखाल हानी कांगडा जिल्ह्यात झाली असून मृतांची संख्या 13 आहे. 55 घरे वाहून गेली असून खेड्यांना शहरांशी जोडणारे अनेक मार्ग बंद झाल्याने ही खेडी शहरांपासून तुटली आहेत. किमान 200 खेड्यांमधील वीज पुरवठा काही दिवसं बंद होता. आता आपत्कालीन साहाय्यता पथकांच्या साहाय्याने तो पूर्ववत करण्यात आला आहे. तरीही अनेक खेड्यांमध्ये जीवनावश्यक वस्तू पोहचविणे शक्य नसल्याने तेथील लोक अडचणीत असल्याची माहिती देण्यात आली. प्रशासनाने पुरांमध्ये अडकलेल्या लोकांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्याची व्यवस्था केली आहे. औषधे आणि कपडेही पुरविण्यात येत आहेत.
शाळांना सुटी
हिमाचल प्रदेश आणि उत्तर भारतातील इतर राज्यांतील पूर प्रभावित भागांमधील शाळा पुढील सूचनेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश संबंधित जिल्हा प्रशासनांनी काढला आहे. सरकारी कार्यालयांमधील कामकाजही प्रभावित झाले आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये दरडी कोसळलेले महामार्ग स्वच्छ करण्याचे काम आपत्कालीन साहाय्यता दलांनी हाती घेतले आहे. काही मार्गांवरील वाहतूक शुक्रवारी संध्याकापर्यंत मोकळी करण्यात आली होती. केंद्र सरकारनेही या राज्यांना साहाय्यता पाठविली असून केंद्रीय आपत्कालीन साहाय्यता दलांना सज्ज ठेवण्यात आलेले आहे. केंद्र सरकार प्रभावित राज्यांच्या सातत्याने संपर्कात आहे. या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी केंद्रीय अधिकाऱ्यांनी परिस्थितीसंबंधी चर्चा केली.
उत्तर भारतात अनेक स्थानी अतिवृष्टी
हिमाचल प्रदेश प्रमाणेच उत्तर प्रदेशचा तराई भाग, उत्तराखंड राज्य, उत्तर प्रदेश राज्याचा पश्चिम आणि मध्य भाग्हृ हरियाणाचा काही भाग तसेच बिहारचा पश्चिम भाग येथे मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. अनेक स्थानी जनजीवन सततच्या पावसाने विस्कळीत झाले आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने पेरण्या लांबल्या आहेत. उत्तर प्रदेशातील नद्या भरुन वाहत असल्याने त्यांच्या तटांवरील गावांना सावधाननेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश प्रशासनाने आपत्कालीन साहाय्यता दलांना सज्ज राहण्याचा इशारा दिला असून अर्धसैनिक दलेही कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यास सज्ज ठेवण्यात आली आहेत.
Comments are closed.