गणपती आले, कोकणवासी अडकले; मुंबई-गोवा महामार्गावर ट्रॅफिककोंडीचा फेरा
गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून लाखो गणेशभक्त आपल्या मायभूमी कोकणकडे रवाना झाले आहेत. मात्र बांधकाम विभाग, पोलीस, जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाचा फज्जा उडाल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर आणि माणगाव शहर परिसरात ३ ते ४ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे वाहनचालक आणि प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. ट्रॅफिककोंडीच्या फेऱ्यात अडकलेल्या गणेशभक्तांना यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या दीड दशकाहून अधिक काळ रखडत असल्याने माणगाव तालुका आणि माणगाव शहराला दरवर्षी वाहतूककोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सव, शिमगोत्सव अथवा सुट्टयांच्या काळात या मार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढते. परिणामी माणगाव परिसरात वाहतूककोंडी होणे ही जणू नित्याचीच बाब बनली आहे. यंदाही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संभाव्य वाहतूककोंडी टाळण्यासाठी मार्गांचे नियोजन, वाहतूक वळवणे तसेच वाहनांना पर्यायी मार्गाने पाठवण्याची व्यवस्था केली. मात्र नियोजन असूनही वाहने पुन्हा माणगाव बाजारपेठेत शिरत असल्याने नियोजनाचा नेमका फायदा कितपत होत आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाहतूक नियोजन कागदावरच
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करून प्रशासन आणि ठेकेदाराला सूचना दिल्या होत्या. मात्र प्रत्यक्ष रस्त्यावर निर्माण झालेली परिस्थिती पाहता, हे नियोजन कागदावरच राहिले आहे. त्यामुळे लाखो गणेशभक्तांमध्ये प्रचंड संताप आहे. ट्रॅफिककोंडीचे ग्रहण सुटणार तरी कधी या विवंचनेत कोकणवासीय आहेत.
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता पुढील दोन दिवस माणगाव आणि इंदापूर परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचे.
सध्या चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत असताना आगामी काळात वाहनांची संख्या आणखी वाढल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता.
प्रशासनाने केलेले नियोजन केवळ कागदावर न राहता महामार्गावर पुरेसे दिशादर्शक फलक, वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्याची गरज.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवासी वाहनचालकांवर तसेच अवजड वाहतुकीवर कडक कारवाईची आवश्यकता.
यामुळे वाढला ट्रॅफिक गुंता
वाहतूककोंडी टाळण्यासाठी बाहेरील प्रवासी वाहने माणगाव बाजारपेठेत न येता त्यांना नियोजित पर्यायी मार्गाने पुढे पाठवण्याचे नियोजन होते. मात्र प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात वाहने माणगाव शहरात येत होती. वाहतूक नियोजन असले तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी आणि वाहनचालकांपर्यंत त्याची माहिती पोहोचवण्यात प्रशासन अपयशी ठरल्यामुळे ट्रॅफिक गुंता वाढत आहे.
Comments are closed.